पिंपरी: मोरवाडी चौकाच्या अलीकडे एकाच वेळी वेगवेगळ्या तीन विभागांकडून काम सुरू असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी चौकातून मोरवाडी, पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर चौकाकडे जाताना महापालिकेच्या पाणीपुरवठा, शहरी दळणवळण तसेच, महामेट्रोकडून काम करण्यात येत आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने सर्व्हिस रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीत दोन ते तीन सिग्नल सुटेपर्यंत वाहनांना प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे.
बीआरटी मार्गात पाणीपुरवठा विभागाकडून भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बीआरटी मार्ग उदध्वस्त करण्यात आला आहे. बॅरिकेट्स तोडण्यात आले आहेत. तर, महामेट्रोकडून पिंपरी स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अनेक वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे.
त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता कोठे ते काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. तसेच, महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाकडून मेट्रोच्या जिन्या व चौकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिजाईन अंतर्गत पदपथ व सायकल ट्रॅक बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. वर्दळीच्या चौकाच्या तोंडावर एकाच वेळी वेगवेगळ्या तीन विभागांनी काम सुरू केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ते कामही संथ गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन
महामेट्रोकडून चौथ्या जिन्याचे काम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्या ठिकाणी अर्बन स्ट्रीट डिजाईनअंतर्गत उर्वरित असलेले काम वेगात पूर्ण करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पादचारी व सायकलस्वारांना पिंपरी ते मोरवाडी चौकांपर्यंत एकसलग पदपथ व सायकल ट्रॅक उपलब्ध होणार आहे. तसेच, जिन्यामुळे मेट्रो स्टेशनवर ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.