पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. लोहमार्गावर पुलासाठी स्टील गर्डर टाकण्यात येत आहेत. त्या कामासाठी दररोज दोन तास रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, त्या वेळेत घट झाल्याने तसेच, अचानक ब्लॉक रद्द होत असल्याने बिघडलेल्या वेळापत्रकामुळे या कामास विलंब होत आहे. त्यामुळे पूल वाहतूक खुला होण्यास विलंब होणार आहे.
पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी या भागास जोडण्यासाठी हा उड्डाणपूल संरक्षण विभागाच्या जागेत उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोहमार्गाच क्रॉसिंगवर थांबण्याची गरज राहणार नाही. तसेच, अवजड वाहनेही सुलभपणे ये-जा करू शकणार आहेत. त्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गापासून डेअरी फार्म रस्त्यावर 1 हजार 290 मीटर लांबीचा आणि 17.20 मीटर रुंदीचा 65 कोटी 28 लाख रुपये खर्चाचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या कामास ठेकेदार टी ॲण्ड टी इन्फा. लिमिटेडने 31 मार्च 2023 ला सुरुवात केली आहे.
पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी झाडे काढणे तसेच, रेल्वे विभागाकडून विविध परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने हे काम दोन वर्ष मुदतीमध्ये पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थापत्य प्रकल्प विभागाने संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे.
उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, केवळ लोहमार्गावरील गर्डर जोडणीचे काम शिल्लक आहे. त्या कामास 14 मार्चपासून रेल्वे विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या क्रेनद्वारे हे काम केले जात आहे. दररोज दोन तास गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. एकूण सात गर्डर दोन्ही बाजूच्या पुलाना जोडण्यात येणार आहेत.
मात्र, दोन तासाची वेळ कमी झाली आहे. तर, अचानक ब्लॉक रद्द केला जात आहे. एप्रिलअखेरपर्यंत ते काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास अधिकचा वेळ लागणार आहे. गर्डरचे काम झाल्यानंतर स्मॅब टाकण्यात येणार आहे. त्यावर डांबरीकरण व इतर कामे केले जाईल. त्यामुळे मे महिन्यात पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन फिसकटण्याचे चिन्ह आहेत.