Military Dairy Farm Flyover Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Military Dairy Farm Flyover: पिंपरीचा मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; आचारसंहितेमुळे उद्घाटन लांबणीवर

६५ कोटी २८ लाखांचा पूल वाहतुकीसाठी सज्ज; तीन मुदतवाढीनंतर काम जवळजवळ पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे पुणे-लोणावळा लोहमार्गावर 65 कोटी 28 लाख खर्चाच्या उड्डाण पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. संरक्षण विभाग, रेल्वे विभागाच्या परवानग्यासह ठेकेदाराकडून झालेली दिरंगाईत हे काम बरेच महिने अडकले होते. अखेर, काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पुल वाहतूक खुला करता येऊ शकतो. मात्र, निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

पुणे-मुंबई जुना महामार्गास पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी हा परिसर जोडण्यासाठी हा उड्डाण पूल संरक्षण विभागाच्या जागेत उभारण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या क्रॉसिंगवर थांबण्याची गरज राहणार नाही. तसेच, अवजड वाहनेही या मार्गावरून सुलभपणे ये-जा करू शकतात. त्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गापासून डेअरी फार्म रस्त्यावर 1 हजार 290 मीटर लांबीचा आणि 17.20 मीटर रुंदीचा 65 कोटी 28 लाख रुपये खर्चाचा उड्डाण पुल बांधण्यात आला आहे. या कामास टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. ठेकेदार कंपनीने 31 मार्च 2023 ला सुरूवात केली.

पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी झाडे काढणे. तसेच, रेल्वे विभागाकडून विविध परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने हे काम दोन वर्ष मुदतीमध्ये म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे स्थापत्य प्रकल्प विभागाकडून संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आल्या. उड्डाण पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. लोहमार्गावरील सर्व गर्डनरची जोडणी पूर्ण झाली आहे. मोठ्या क्रेनद्वारे हे काम करण्यात आले. सात गर्डर दोन्ही बाजूच्या पुलाना जोडण्यात आल्यानंतर स्लॅब टाकून डांबरीकरण करण्यात आले आहे.

तीन वेळा तब्बल 17 महिन्यांची मुदतवाढ देऊनही काम 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण न झाल्याने ठेकेदार टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. कंपनीवर कारवाई करण्यात आली. एक ऑगस्टपासून भाववाढीचा निर्देशांक गोठवण्यात आला. तर, एक सप्टेंबरपासून प्रत्येक दिवसाला 1 हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

दरम्यान, हे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पुल वाहतुकीस खुला करता येऊ शकतो, असे अधिकार्‍यांचे मत आहे. मात्र, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. आचारसंहिता 27 ऑक्टोबरपर्यंत आहे. आचारसंहिता उठल्यानंतरच उद्घाटनाचा कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे.

सुरळीत वाहतुकीसाठी अंडरपासही

या उड्डाण पुलावर पुणे-मुंबई जुन्या महामार्गाकडून वाहनांची ये-जा सुलभ व्हावी म्हणून दापोडी ते निगडी या ग्रेडसेपरेटर आणि मेट्रोच्या मार्गाखाली भुयारी मार्ग (अंडर पास) बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी गावातून उड्डाणपुलावरून आल्यानंतर दापोडी व भोसरीच्या दिशेने जाणे सोईस्कर होणार आहे. भुयारी मार्ग उभारण्यास महामेट्रो प्रशासनाने परवानगी दिली आहे. या कामासाठी सल्लागारही नियुक्त करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

आवश्यक परवानग्या घेऊन पूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन

मिलिटरी डेअरी फार्म उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक परवानग्या घेऊन पुलावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

प्रकल्पाची स्थिती:

  • वर्क ऑर्डर -31 मार्च 2023

  • मुदत -2 वर्षे (31 मार्च 2025 पर्यत)

  • पहिली मुदतवाढ-30 नोव्हेंबर 2025 (8 महिने)

  • दुसरी मुदतवाढ-30 एप्रिल 2026 (6 महिने)

  • तिसरी मुदतवाढ-31 जुलै 2026 (3 महिने)

  • काम जवळजवळ पूर्ण -3 ऑक्टोबर 2026

  • प्रकल्पाचा खर्च : 65 कोटी 28 लाख रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT