Pimpri Metro Station Entry Gate Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Metro Station Entry Gate: पिंपरी मेट्रो स्टेशनचा चौथा जिना शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला

आंबेडकर चौक व जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडील प्रवाशांना मोठा दिलासा; सुरक्षितता आणि सोयींमध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी मेट्रो स्टेशनचा चौथा जिना शनिवार (दि.14)पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून येणाऱ्या नागरिकांना स्टेशनवर ये-जा करणे सुलभ होणार आहे.

पिंपरी मेट्रो स्टेशनवरील नवीन चौथे प्रवेशद्वार प्रवाशांच्या सेवेसाठी शनिवारपासून खुले केले जाणार आहे. या नवीन प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांना वर्दळीचे रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होईलच आणि सुरक्षेमध्ये वाढ होईल, असा दावा महामेट्रोने केला आहे.

तो प्रवेशद्वार हे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कमला क्रॉस व्यापारी संकुलाशेजारी आहे. तेथे जिना, लिफ्ट आणि सरकता जिन्याची सोय आहे. प्रवेशद्वार सुरू झाल्यामुळे शहरातून मेट्रो स्थानकात येणाऱ्या व स्थानकातून बाहेर जाणाऱ्या प्रवाश्यांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांचीही सोय होणार आहे. मोरवाडी चौकातील गर्दी कमी होण्यास सहाय्य होणार आहे. या जिन्यासंदर्भात ‌‘पुढारी‌’ने वारंवार छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध करत सातत्याने पाठपुरावा केला आहे.

विलंबाने जिन्याचे काम पूर्ण

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोसेवा 6 मार्च 2022 ला सुरू झाली. त्यानंतर चार वर्षांनंतर महामेट्रोने पिंपरी स्टेशनवरील चौथा जिना तयार केला आहे. महामेट्रो व्यवस्थापनाचा कासव गती कारभार तसेच, कामास होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

प्रवाशांची सुविधा

मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सुविधा लक्षात घेऊन ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या प्रवेशद्वाराचा मोठा फायदा होणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT