Pakistani Cream Pudhari
पिंपरी चिंचवड

Pakistani Beauty Cream: 'मेड इन पाकिस्तान' क्रीमची पिंपरीत विक्री; २३ क्रीम जप्त

रिव्हर रोडवरील दुकानावर दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; १२ हजार ६५० रुपयांचा माल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या 'मेड इन पाकिस्तान' नमूद केलेल्या 'गोरी ब्यूटी क्रीम'ची पिंपरीतील दुकानातून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने बुधवारी (दि. २३) रिव्हररोड परिसरात कारवाई करून १२ हजार ६५० रुपये किमतीच्या २३ क्रीम जप्त केल्या.

प्रकाश मनोहरलाल गुरू (३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'गोरी ब्यूटी क्रीम'च्या भारतातील कंपनीचे अधिकृत तपासणी अधिकारी रईसोदीन इनामदार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्हर रोडवरील पीएमपीएमएल बस थांब्याजवळ असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स दुकानात 'मेड इन पाकिस्तान' नमूद असलेल्या आणि भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या बनावट गोरी ब्यूटी क्रीमची विक्री होत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली होती.

त्यानुसार, एटीबीच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या मदतीने दुकानात कारवाई केली. तपासणीदरम्यान दुकानात प्रत्येकी ५५० रुपये किमतीच्या २३ क्रीम आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत १२ हजार ६५० रुपये आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने पिंपरी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित केणे करीत आहेत.

पाकिस्तानातील वस्तूंवर भारतात बंदी

केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या २ मे २०२५च्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून भारतात सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 'मेड इन पाकिस्तान' नमूद असलेल्या वस्तूंची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT