पिंपरी: अतिवृष्टीमुळे शहरात साधारण जुलै महिन्यात शेतकरी, रहिवाशांचे नुकसान झाले होते. त्यात जवळपास 8 हजारांहून अधिक कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये नुकसान भरपाईचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, अद्यापि काही जणांचे ई केवायसी आणि बँक खाती अद्ययावत नाहीत. त्यामुळे ही रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग करण्यात येईल. त्यामुळे लाभार्थी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयामार्फत लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास एक हजार लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्यापैकी 80 हून अधिक जणांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही. तसेच, काही लाभार्थी हे पत्त्यावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे ई केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांची संबंधित रक्कम ही शासनाकडे परत जाणार आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केली आहे.
तसेच, अनेक लाभार्थ्यांची खाती पोस्टात असल्याने त्यावर रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. या संदर्भात पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे. ई केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करून नुकसानभरपाई मिळवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.