पिंपरी: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते दापोडीदरम्यानच्या ग्रेड सेपरेटर मार्गामध्ये जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. इम्पायर इस्टेट ते चिंचवड स्टेशन सिग्नलपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पुन्हा खड्ड्यांची समस्या उभी ठाकली आहे.
महापालिकेने काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली असली, तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा व्हावी, या उद्देशाने दापोडी ते निगडीदरम्यान सुमारे 12.5 किलोमीटरचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. या प्रकल्पात तीन ग्रेड सेपरेटर, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाण पुलांचा समावेश आहे. दररोज हजारो वाहनचालक हा मार्ग वापरतात; मात्र सध्या रस्त्यावरील खड्डे, तडे गेलेले डांबर आणि सेवा रस्त्यांची दुरवस्था यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे.
दरम्यान, ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पांतर्गत पदपथ, सायकल मार्ग आणि बीआरटी मार्गिकेतील सुधारणा कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येते. काही भागांत ब्लॉक बसविण्याचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी पदपथाचे काम थांबलेले आहे.
बीआरटी मार्गिकेत जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, पीएमपीएमएल बस सेवा सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली असून तेथेही कोंडी वाढली आहे.
महापालिकेने केलेले डागडुजीचे काम ‘पाण्यात गेले’ असून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अचानक खड्डे चुकविताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दापोडी ते निगडी (12.5 किमी) संरचना : 3 ग्रेड सेपरेटर, 8 भुयारी मार्ग, 2 उड्डाण पूल सध्याची स्थिती : खड्डे, तडे गेलेले रस्ते, अर्धवट कामे नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व खड्डे बुजवून दर्जेदार दुरुस्ती करावी, तसेच अर्धवट कामे पूर्ण करून वाहतुकीची कोंडी कमी करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनानेही संबंधित विभागांना सूचना देऊन परिस्थिती सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र प्रत्यक्ष कृती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रवाशांना होणारा त्रास
वाहतूक कोंडीत वाढ.
अपघाताचा धोका.
प्रवासाचा वाढलेला वेळ.
इंधनाची नासाडी.
ग्रेड सेपरेटरचा उद्देश
दापोडी ते निगडी विनाअडथळा प्रवास