पिंपरी: गणेशोत्सवानिमित्त उद्योगनगरीतील अनेकजण आपल्या गावी जातात. त्यांचा ओढा एसटी, रेल्वेकडे असतो. सणानिमित्त एस.टीने नियमित गाड्यांपेक्षा ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. परंतु गर्दी वाढल्याने अनेकांना ऐनवेळी नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरावी लागते; मात्र ऐन सणासुदीत खासगी वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
नोकरी व कामानिमित्त पिंपरीत राज्य व राज्याबाहेरील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सध्या गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु असून, हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्या गावी जातात. गावाकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, एस.टी. कडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रेल्वेनेदेखील जादा गाड्या सोडल्या आहेत; परंतु गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने एस.टी. ला गर्दी होत आहे. त्यामुळे अनेकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने ट्रॅव्हल्स वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारले जात आहे.
कोकणात जाणाऱ्या एस.टी गाड्यांचे आगाऊ बुकिंग फुल झाले आहे. सणासुध्दीला कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून १७५ आतिरिक्त बस सोडण्यात येत आहेत; मात्र प्रामुख्याने सिंधूदुर्ग, चिपळूण, रत्नागिरी, या भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. अशावेळी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पुण्याहून कोकणात जाण्यासाठी इतर वेळी ७०० ते ८०० रुपये असते; परंतु ऐन गणेशोत्सवापूर्वी ११०० ते १२०० रुपये झाले आहे.
इंधन दरवाढीचे कारण:
ट्रॅव्हल्सच्या बसगाडया आजही डिझेलवर धावतात. परिणामी वाढलेले इंधनाचे दर त्यासह ऑफ सीजनला रोडावलेली प्रवासी संख्या याचे कारण देत गर्दीच्या हंगामात तिकीट दर वाढवण्यात येतो; मात्र दुसरीकडे एस.टी महामंडळाच्या गाड्या आणि रेल्वे तिकीटांचे दर मर्यादित असतात.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी १७५ गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रुप बुकिंग, रिझर्वेशन, आगाऊ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सूट देण्यात आली आहे.पल्लवी पाटील, आगारप्रमुख
गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स संदर्भात प्रवाशांनी तक्रार केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत खासगी बसेसवर कारवाई करण्यात येत आहे.राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.