पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी, पिंपरी येथील दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दि.14) दिव्यांग बांधवांच्या रोजगार मेळावा घेण्यात आला. सेन्टर ऑफ एक्सलन्सअंतर्गत आयोजित या मेळाव्यात एकूण 587 युवक व युवतींनी नोंदणी केली. तर, 25 दिव्यांगांना नोकरी मिळाली.
मेळाव्याचे उद्घाटन समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक परेश गांधी, एनेबल इंडियाचे प्रतिनिधी प्रीती लोबो, स्पार्क मिंडा कंपनीचे सुमेध लव्हाळे, बिग बास्केट कंपनीचे अमोल पवार, सीएसआर सेलच्या श्रुतिका मुंगी, दिव्यांग संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग उमेदवार, त्यांचे पालक आदी उपस्थित होते.
मेळाव्यापूर्वी दिव्यांग उमेदवार व त्यांच्या पालकांना प्रशिक्षण व समुपदेशन याद्वारे मुलाखतीसाठी आवश्यक पूर्वतयारीही करून घेण्यात आली होती. स्पार्क मिंडा व बिग बास्केट या दोन कंपन्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. नोंदणी केलेल्या 587 पैकी शहरातील 151 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीत 64 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 22 उमेदवार अस्थिव्यंग, 33 विशेष दिव्यांगत्व, लो व्हिजन प्रवर्गातील 2, मूकबधिर प्रवर्गातील 7 आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश होता. बिग बास्केट कंपनीसाठी 22 उमेदवारांनी मुलाखत दिली असून, 11 जणांची निवड झाली. स्पार्क मिंडा कंपनीसाठी 45 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, त्यापैकी 14 जणांची निवड करण्यात आली.
दर्शना फडतरे यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल बनुबाकोडे यांनी आभार मानले. कंपन्या, संस्थांनी दिव्यांगांना रोजगारांच्या संधी द्याव्यात संधी, सुविधा व सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यास दिव्यांग नागरिक हे केवळ लाभार्थी नव्हे तर, समाजाच्या प्रगतीस हातभार लावणारे घटक बनू शकतात. प्रत्येक कंपनीने, प्रत्येक संस्थेने सामाजिक जबाबदारी म्हणून दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी द्यावी. सर्वसमावेशक समाज निर्माण करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे. समाजात दिव्यांगांविषयी असणारे गैरसमज आणि मानसिक अडथळे दूर करून त्यांना समान संधी द्याव्यात, असे आवाहन समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले आहे.