Crime Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Crime News: दिघीत जावयाला बांबू-दगडाने मारहाण; चिंचवडमध्ये ११ लाखांची ऑनलाइन फसवणूक

सासरच्या वादातून हिंसक हल्ला, वाळूच्या ढिगाऱ्यावरून दोन गटांत हाणामारी; मोबाईल हॅक करून बँक खात्यातून रक्कम लंपास

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: घर सोडून गेल्याच्या कारणावरून जावयाला आणि त्याच्या भाच्याला सासरच्या मंडळींकडून बांबू व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना १९ जून रोजी दिघी परिसरात घडली.

याप्रकरणी प्रकाश महादेव राठोड (३४, रा. समर्थनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय नामदेव चव्हाण (वय २०), अनुराग नामदेव चव्हाण (वय २२) आणि रेणुका नामदेव चव्हाण (२३, सर्व रा. दिघी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घर सोडून गेल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातून लहान मेहुणा अक्षय याने लाकडी बांबूने फिर्यादीच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली. तर मोठा मेहुणा अनुराग याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. मेहुणी रेणुका हिने शिवीगाळ केली. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भाच्यालाही मारहाण करण्यात आली.

वाळूच्या ढिगाऱ्यावरून दोन गटांत हाणामारी

रस्त्यावरील वाळूचा ढिगारा हटविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ जून रोजी खेड तालुक्यातील चिंबळी येथील बर्गेवस्ती भागात घडली.

संध्या अनिरुद्ध यादव (३९, रा. मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास आत्माराम चौधरी (वय ३४) आणि सोनाली विकास चौधरी (वय ३१, दोघे रा. चिंबळी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या बांधकामाच्या साईटवर असताना आरोपी विकास याने रस्त्यावरील वाळूचा ढिगारा हटविण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादातून विकास याने लाकडी फळीने फिर्यादीच्या कपाळावर मारहाण केली. तसेच तिचे पती अनिरुद्ध यादव यांनाही डोक्यात व पाठीवर मारहाण करण्यात आली. सोनाली चौधरी हिनेही शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, विकास चौधरी यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत, त्यांच्या पत्नी सोनाली या बांधकाम साईटवर गेल्या असता रस्त्यावरील डस्ट हटविण्यावरून शेजारी राहणाऱ्या अनिरुद्ध यादव आणि संध्या यादव यांनी वाद घातल्याचे म्हटले आहे. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या विकास यांना काठीने मारहाण करून धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मोबाईल हॅक करून ११ लाखांचा गंडा

एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचा बनाव करून एका व्यक्तीचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यानंतर बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवत ११ लाख ३९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ एप्रिल रोजी चिंचवड येथील गोखले वृंदावन सोसायटीत घडली. याप्रकरणी पीडित व्यक्तीने शनिवारी (दि. २०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीला अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल करून तो एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. गॅस सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगून आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठविली. संबंधित लिंकवर क्लिक करताच फिर्यादीचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर आरोपींनी बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवून युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यांतून एकूण ११ लाख ३९ हजार ९९७ रुपये ५६ पैसे परस्पर काढून घेतले. या प्रकरणात कॅनरा बँक, बिलडेस्क, रोझरपे आणि पेटीएम खातेदारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT