Fire Safety Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Fire Safety Coaching Classes: पिंपरी-चिंचवडमधील कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न; अग्निशमन विभागाचा इशारा

मर्यादित जागा, अपुरी फायर सेफ्टी आणि नियमभंगामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका; नियमित तपासणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी - चिंचवड शहरात खासगी कोचिंग क्‍लासेस आणि प्रशिक्षण संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. हजारो विद्यार्थी विविध क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षण अग्निशमन विभागाने नोंदवले आहे. वेळीच आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारली नाही, तर भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. आयटी, ऑटोमोबाईल, उत्पादन उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधींमुळे राज्यासह देशभरातील विद्यार्थी शहरात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे आणि खासगी शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. अनेक संस्था व्यावसायिक संकुल, बहुमजली इमारती आणि गाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी अग्निसुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

मर्यादित जागेत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अपुरे असणे, जिने व कॉरिडॉरमध्ये साहित्य ठेवणे, अग्निशामक यंत्रणा कालबाह्य होणे, फायर अलार्म प्रणाली कार्यरत नसणे तसेच विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी न करणे अशा बाबी अनेक ठिकाणी आढळून येतात. दुर्घटना घडल्यास काही मिनिटांचा विलंबदेखील मोठ्या जीवितहानीचे कारण ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

बचाव आराखडा आवश्यक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कोचिंग क्लास आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत अग्निशामक यंत्रणा, फायर अलार्म, आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, धूर नियंत्रण प्रणाली आणि सुरक्षित निर्गमन मार्ग असणे आवश्यक आहे; तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित मॉक ड्रिल घेणे, आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देणे आणि बचाव आराखडा तयार ठेवणे गरजेचे आहे.

कोचिंग क्लासेसचे वाढते जाळे

हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, चाकण आणि रावेत परिसरात स्पर्धा परीक्षा, जेईई-नीट, एमपीएससी-यूपीएससी, बँकिंग, परदेशी शिक्षण, आयटी आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या शेकडो संस्था कार्यरत आहेत. दररोज हजारो विद्यार्थी या संस्थांमध्ये ये-जा करतात. त्यामुळे या परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व अधिक वाढले असून संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

अग्निसुरक्षा कागदोपत्रीच

शैक्षणिक संस्थांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये विद्युत यंत्रणांमधील बिघाड, शॉर्टसर्किट, वातानुकूलन यंत्रणेतील दोष, ज्वलनशील साहित्याचा वापर आणि निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे आढळून येतात. त्यामुळे संस्थांनी अग्निसुरक्षेला केवळ कागदोपत्री बाब म्हणून न पाहता ती दैनंदिन व्यवस्थापनाचा भाग बनविण्याची गरज असल्याचे मत अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

सुरत, लखनऊ दुर्घटनांमधून धडा

गुजरातमधील सुरत येथे २४ मे २०१९ रोजी तक्षशिला आर्केडमधील कोचिंग क्लासला लागलेल्या भीषण आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. आग आणि धुरामुळे अनेक विद्यार्थी वरच्या मजल्यावर अडकले होते. काही विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्याचे चित्र देशाने पाहिले होते. या दुर्घटनेनंतर कोचिंग क्लासेसच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. अलीकडेच उत्तर प्रदेशातील लखनौ येथे प्रशिक्षण संस्थेशी संबंधित इमारतीत लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर गर्दीच्या वापराच्या इमारतींमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पिंपळे सौदागरमध्ये टळली मोठी दुर्घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये १ डिसेंबर २०२५ रोजी पिंपळे सौदागर येथील एका कोचिंग क्लासमध्ये आग लागली होती. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. मात्र, अग्निशामक दलाने वेळीच धाव घेत ४२ विद्यार्थी आणि इतर नागरिकांची सुरक्षित सुटका केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने शहरातील कोचिंग क्लासेसच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले होते.

संस्थांनी काय करावे?

  • फायर सेफ्टी कम्प्लायन्स प्रमाणपत्र अद्ययावत ठेवणे

  • प्रत्येक मजल्यावर कार्यरत अग्निशामक यंत्रणा ठेवणे

  • आपत्कालीन निर्गमन मार्ग कायम मोकळे ठेवणे

  • विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे

  • विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी मॉक ड्रिल आयोजित करणे

  • क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश टाळणे

  • ज्वलनशील साहित्याचा वापर नियंत्रित ठेवणे

  • पालकांनी काय तपासावे

  • क्लासमध्ये अग्निशामक यंत्रणा आहे का?

  • आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे का?

  • इमारतीमध्ये पुरेसे जिने आहेत का?

  • विद्यार्थ्यांची संख्या आणि जागा यामध्ये तफावत तर नाही ना?

  • संस्थेकडे वैध अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आहे का?

कोचिंग क्लास, प्रशिक्षण संस्था आणि शैक्षणिक केंद्रांनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट, अग्निशामक यंत्रणांची नियमित तपासणी, आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवणे आणि मॉक ड्रिल घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये.
ऋषिकांत चिपाडे, केंद्र अधिकारी, अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT