वर्षा कांबळे
पिंपरी: निगडीतील यमुनानगर रुग्णालयात फक्त प्रसूती आणि बालकांवरच उपचार केले जातात. इतर रुग्णांना याठिकाणी अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत. रुग्णालयासाठी जागा मोठी असली तरी रुग्णालयाचे विस्तारीकरण करता येत नाही. कारण यमुनानगर रुग्णालय हे रेडझोन क्षेत्रात येत असल्याने याठिकाणी बांधकाम परवाना मिळत नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे यमुनानगर रुग्णालयाचा विस्तार रखडला आहे.
वायसीएमच्या धर्तीवर होऊ शकतो विस्तार
रुग्णालय ज्या परिसरात आहे ती जागा खूप मोठी आहे. याठिकाणी वायसीएमच्या खालोखाल रुग्णालयाचा विस्तार होऊ शकतो. मात्र, रेडझोन हद्दीमुळे बांधकाम करता येत नाही. रुग्णालयात सध्या पत्राशेडमध्ये ओपीडी तयार केली आहे. याठिकाणी 200 ते 300 रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. येथील लोकसंख्या जवळपास 35 हजार आहे. रुग्णालयाचा विस्तार केल्यास रहिवाशांना तालेरा किंवा वायसीएममध्ये जावे लागणार नाही.
फक्त प्रसूती, कुटुंब कल्याण
यमुनानगर रुग्णालयात महिला प्रसूतीगृह, ओपीडी तसेच इतर उपचार होत असतात. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नंबर 22, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, कृष्णानगर, सहयोगनगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या दवाखान्यातील वाढती गर्दी पाहता सध्याची इमारत अपुरी पडत आहे.
रुग्णांची गैरसोय
या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता याठिकाणी कोणतेही शासकीय रुग्णालय नाही. रात्री-अपरात्री नागरिकांना अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात जावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल दवाखान्याच्या धर्तीवर यमुनानगर दवाखाना 100 बेडचे/खाटांचा दवाखाना तसेच अतिदक्षता विभाग करण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबी लक्षात घेता येथे प्रशस्त रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
पुरुष विभाग नाही, महिलांच्या विभागात दाखल
रुग्णालयात पुरुषांसाठी वेगळा विभाग नाही. एखाद्या वेळी एखाद्या पुरुषाला दाखल करण्याची गरज भासल्यास त्यांना महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल केले जाते. महिलांची गैरसोय होतेच, पण पुरुषांचाही नाईलाज होतो.
आम्ही रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केला. मात्र, रेडझोन हद्दीत रुग्णालय असल्याने बांधकाम परवाना मिळत नाही.डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी, महापालिका
यमुनानगर रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत प्रशस्त शासकीय रुग्णालय उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वायसीएम रुग्णालयात जावे लागत आहे. याठिकाणी असलेल्या महिला प्रसूतिगृहासह सुसज्ज ओपीडी व अत्याधुनिक उपचार सुविधा विस्ताराने उपलब्ध होणे गरजेचे बनले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.बापू घोलप, नगरसेवक
यमुनानगर रुग्णालय हे वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडत असून, येथे शंभर बेडचे प्रशस्त रुग्णालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, प्रशासन रेडझोनचे कारण पुढे करत आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील अमरधाम स्मशानभूमीत कोट्यवधी रुपये खर्चून दुसरी विद्युत दाहिनी उभारण्यात आली. स्मशानभूमीला विरोध नाही; परंतु नागरिकांच्या आरोग्य सुविधादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जिवंत नागरिकांच्या आरोग्यापेक्षा मृत्यूनंतरच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे संरक्षण विभागाची विशेष परवानगी घेऊन रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात यावे.दीपक खैरनार, माहिती अधिकार कार्यकर्ते