Pimpri Chinchwad Wrong Side Driving Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Wrong Side Driving: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रॉंग साइड’ वाहनांचा कहर; ५० हजार चालकांवर कारवाई, ५.८६ कोटींचा दंड वसूल

वाहतूक नियम धाब्यावर; जानेवारी ते जुलैदरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, अपघातांचा धोका कायम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात विरुध्द दिशेने वाहने चालविण्याचा बेजबाबदार प्रकार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. शहरातील काही प्रमुख रस्ते, एकेरी मार्ग, सेवारस्ते, चौकाजवळील वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणे विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा पद्धतीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ५० हजार ३९८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून जानेवारी ते जुलैदरम्यान कारवाई करण्यात आली असून, ५ कोटी ८६ लाख ४१ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये दुचाकीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक बेजबाबदार दुचाकीस्वार सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. परिणामी समोरुन येणाऱ्या वाहनचालकांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघाताची घटना घडते. अनेक घटनांमध्ये गंभीर दुखापती, हातपाय मोडणे, डोक्याला मार लागणे, तर काही वेळेस मृत्यूच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेषत: दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय विरुध्द दिशेने जात असल्याने अपघात झाल्यास जखमी होण्याची प्रमाण आधिक वाढल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

दुचाकीस्वार वाहतूक कोंडी झाल्यानंतर तसेच वाहतुकीचे नियम डावलून विरुद्ध दिशेने वाहने दामटवितात; मात्र त्याच मार्गावरून समोरून येणाऱ्या वाहनचालकांना अनपेक्षितपणे आलेल्या वाहनांमुळे वेग नियंत्रित करणे कठीण होते. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. तसेच पादचाऱ्यांसाठी तर ही स्थिती आधिकच धोकादायक असून झेब्रा क्रॉसिंग, सिग्नलजवळ अचानक समोरुन येणाऱ्या वाहनांमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.

बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून जानेवारी ते जुलै दरम्यान विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या ५० हजार ३९८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, ५ कोटी ८६ लाख ४१ हजार दंड एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘वेळ जातो साहेब’

विरुध्द दिशेने वाहन घेऊन येताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यानतंर विविध कारणे सांगितली जातात. समोरून फेरी मारायला वेळ लागतो. या वेळी जाऊद्या साहेब, अशा विविध कारणांखाली पोलिसांना विनंती केली जाते. या मानसिकतेमुळे वाहतूक शिस्त कोलमडत असल्याचे दिसून येते; मात्र नियम पाळणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे स्वतःच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडी होते. चौकाचौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर, तसेच रिक्षाचालकांवर योग्य ती कारवाई केली जात आहे
विक्रांत देशमुख पोलिस उपायुक्त वाहतूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT