Pimpri Chinchwad Waterlogging Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Waterlogging: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळापूर्व तयारीचा दावा फोल? रस्ते, बसथांबे पाण्याखाली; नागरिकांची गैरसोय

स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये गाळ-कचऱ्यामुळे निचरा ठप्प; साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरवासीयांचे हाल होऊ नयेत, म्हणून पालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र गेले काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या पाण्यातून वाट काढत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पाऊस पडून अनेक तास उलटल्यानंतरही शहरातील विविध ठिकाणी बसथांबे, कंपन्यांसमोरील रस्ते आणि प्रमुख मार्गांवर पाणी तसेच साचलेले दिसून येत आहे. स्टॉर्म वॉटर लाईनची झाकणे पाण्याखाली गेली असताना पाण्याचा निचरा मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा प्रवाह अडवणारा गाळ, कचरा आणि वेळेवर न झालेली साफसफाई यामुळे नागरिकांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत ये-जा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील विविध औद्योगिक भाग, बसथांबे आणि मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी स्टॉर्म वॉटर लाईनच्या झाकणांवरच पाणी साचलेले आढळले. निचऱ्यासाठी असलेली व्यवस्था अस्तित्वात असूनही पाणी वाहून जात नसल्याने रस्त्यांवर लहान तळ्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पादचारी मार्गही पाण्याखाली गेल्याने नागरिकांना वाहनांच्या मार्गाने जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.

बसची वाट पाहणारे प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना साचलेल्या पाण्यातच उभे राहावे लागत आहे. कंपन्यांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने डासोत्पत्ती होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. पावसाचे पाणी त्वरित वाहून जाण्याऐवजी साचत असल्याने सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

स्टॉर्म वॉटर लाईनची नियमित देखभाल झाली का?

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले आणि स्टॉर्म वॉटर लाईन स्वच्छ करण्याचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. झाकणांभोवती गाळ, प्लास्टिक आणि कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. नियमित साफसफाई झाल्यास झाली अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचा वेळ, आरोग्य आणि सुरक्षितता तिन्ही धोक्यात आली आहे. संबंधित विभागाने तातडीने स्टॉर्म वॉटर लाईनची तपासणी करून गाळ व कचरा काढणे, नाले स्वच्छ करणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसामुळे काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पाणी साचत आहे. ज्या ठिकाणी निचऱ्याची समस्या वारंवार उद्भवते, त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात येतील. संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, स्थापत्य पिंपरी-चिंचवड महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT