Water  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये १५% पाणी कपात; तरीही पाण्याची नासाडी सुरूच, कारवाई नाही

वाहन धुलाई केंद्रे व सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अपव्यय; महापालिकेची कारवाई केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: यंदा पर्जन्यमान कमी होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा काळात पाण्याची बचत हाच सर्वात मोठा उपाय आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही शंभर टक्के पाणी गळती रोखण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे, नागरिकही पाण्याचा अपव्यय व नासाडी करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवार (दि.19) पासून 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. असे असताना अनेक ठिकाणी पाण्याचा सर्रास अपव्यय व नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः जुनी-नवी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, वाहन विक्रेते तसेच, काही वाहन धुलाई केंद्रांकडून (वॉशिंग सेंटर) दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यातही अनेक हाऊसिंग सोसायटी, बंगलो व घरांमध्ये टाक्या भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच, सोसायटी व बंगलो परिसरात रस्ते, अंगण, जिने व पार्किंग धुतले जात आहेत. उद्यान व बागांना पिण्याचे पाणी वापरले जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळेत वाहन विक्री केंद्रांबाहेर अनेक दुचाकी व चारचाकी वाहने धुतली जात असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वाहन धुतल्यानंतर उरलेले पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते किंवा रस्ते स्वच्छ करण्याच्या नावाखाली पाणी टाकले जाते.

यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक वाहन धुलाई केंद्रांमध्ये वापरले जाणारे पाणी नेमके कुठून येते, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. या केंद्रांमध्ये महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरले जाते की बोअरवेलचे पाणी, याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

नासाडी करणार्‍यांवर कारवाई नाहीच

शहरात पिण्याच्या पाण्याची नासाडी करणार्‍यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई केली जाईल, अशी घोषणा आयुक्तांनी केली होती. मात्र, शहरात पिण्याची नासाडी व अपव्यय सुरूच आहे. तरीही, पाणीपुरवठा विभाागकडून अद्याप कोणावरही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी दिलेले आश्वासन केवळ कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT