Pimpri Chinchwad water supply Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad water supply: शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापौर रवी लांडगे यांची जलशुद्धीकरण केंद्रांना भेट

निगडी व चिखली केंद्रांची पाहणी; भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन सूचना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवी लांडगे यांनी शनिवार (दि. 7) निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा, भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत लांडगे यांनी सविस्तर माहिती घेतली.

सत्कार, हारतुरे स्वीकारण्यास फाटा देत महापौर लांडगे यांनी दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रासाठी इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज 90 एमएलडी पाणी घेण्यात येते. ते पाणी शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी 200 एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याची माहिती महापौर लांडगे यांनी घेतली.

भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया, शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.

निगडी केंद्रातून 75 टक्के शहराला पाणी

निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची महापौरांनी पाहणी केली. त्यांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्र सुरुवातीला 114 एमएलडी क्षमतेचे होते. शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या केंद्र 550 एमएलडी क्षमतेने कार्यरत आहे. पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून आणि पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून शहरातील सुमारे 75 टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष व वितरण व्यवस्थेची माहिती त्यांना देण्यात आली.

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने व दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT