Water  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई व दूषित पाण्यावरून सभागृहात संताप

कमी दाबाने पाणीपुरवठा, काही भागांत दूषित पाणी; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, भामा आसखेड योजनेला गती देण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही भागांत दूषित पाणी येत आहे. त्यावरून नगरसेवकांनी सभागृहात संताप व्यक्त केला. या प्रकरणाचा शोध घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

निवडणुका झाल्यानंतर पिंपळे गुरव, सुदर्शनगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या प्रमाणात कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करीत आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप भाजपचे शाम जगताप, रविना आंघोळकर यांनी केला. स्मार्ट सिटीतील भागात असे होत असल्याबद्दल आंघोळकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. चिखली परिसरात, कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे विकास साने व यश साने यांनी केली. पवना नदीतून कमी प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने महापालिकेस 15 ते 20 एमएलडी पाणी कमी मिळत आहे. त्याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा दावा भाजपचे संजय काटे यांनी केला.

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या भागांकडे महापालिका प्रशासनाचे पूर्वीपासूनच दुर्लक्ष होत आहे. जाणीवपूर्वक पाणी कमी प्रमाणात सोडले जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी केला. तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय राजवटीत भ्रष्ट कारभार केला असून, त्यांची पाप नाशिकमध्येही धुतली जाणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. आकुर्डी भागात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याचे भाजपचे कैलास कुटे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी गेल्या तीस वर्षांपासून शहरातील पाणी समस्या जैसे थे असल्याचा आरोप केला. पाणी गळती कमी करण्यास प्रशासनाला यश आले नसून, सल्लागारांवर मात्र, कोट्यवधीचा खर्च केला जात असल्याची टीका त्यांनीकेली. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केली.

पुढील सभेपर्यंत भामा आसखेड पाणी योजनेसाठी नवीन ठेकेदार नेमा: महापौर लांडगे

भामा आसखेड पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला बदलून तेथे नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया पुढील सभेपर्यंत पूर्ण करा. तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला 167 एमएलडी स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहराची पाण्याची गरज भागणार आहे, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिले.

अधिकाऱ्यांचा माज उतरवणार

चार वर्षातील प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांचा माज वाढला आहे. ते नगरसेवकांना सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. काही कामे घेऊन गेल्यास निधी नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांचा उत्साह कमी होत आहे. आपण या काळात का निवडून आलो, असा प्रश्न त्यांना पडत आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय राजवटीतील मस्तीत राहू नये. त्यांनी नगरसेवकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. प्रभागातील एखादे काम सांगितल्यानंतर त्याला नकार न देता त्याला पर्याय उपलब्ध करून द्यावा. मुजोर अधिकाऱ्यांचा माज उतरवला जाईल, असा इशारा सत्ताधाऱ्यांसह विरोध नगरसेवकांनी दिला आहे.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप

अग्निशमन विभागाचा एक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय फायर सर्टीफिकेट देत नाही. त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. ठराविक रक्कम जमा झाल्याशिवाय तो अधिकारी घरी जात नाही, असा आरोप सभागृहात अनेक नगरसेवकांनी केला. त्यांची दखल घेऊन महापौरांनी त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तडकाफडकी इतर विभागात बदली करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. अग्निशमन विभागाच्या संबंधित परवाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत देण्याची सूचनाही केली.

दर महिन्याच्या 15 तारखेस होणार सर्वसाधारण सभा

महापालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्याच्या 15 तारखेस घेण्यात येणार आहे. त्या दिवशी सुटी आल्यास आदल्या दिवशी सभा घेण्यात येईल, असे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT