Water Park Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Park: पिंपरी-चिंचवड महापालिकेला ठेकेदाराचा ‘धक्का’; वॉटर पार्कचे ८३.३७ लाख भाडे थकीत

दहा वर्षांपासून थकबाकी; ५.७३ कोटींचा मालमत्ताकरही बाकी, नोटीस देऊन वर्ष उलटले तरी कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरण येथील स्व. इंदिरा गांधी उद्यान म्हणजेच दुर्गादेवी टेकडी येथील अप्पूघर शेजारी वॉटर पार्क आहे. त्या वॉटर पार्कचे संबंधित ठेकेदाराने तब्बल दहा वर्षांपासून 83 लाख 37 हजार 95 रुपये भाडे थकवले आहे. तरीही संबंधित ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. परिणामी, या ठेक्यातही गोलमाल असल्याचे स्पष्ट होत आहे. हे प्रकरण अंगलट येत असल्याने महापालिकेच्या विद्युत विभाग व भूमी आणि जिंदगी विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. महापालिकेने तेथील अप्पूघर हे सात एकर जागेवरील मनोरंजननगरी पुष्पक अ‍ॅम्युजमेंट या ठेकेदार संस्थेला तब्बल 21 वर्षांसाठी भाडे तत्त्वावर दिले आहे.

ऑक्टोबर 2005 ते ऑक्टोबर 2026 असा हा 21 वर्षांचा करारनामा आहे. त्यासाठी सुरुवातीला 2 लाख 75 हजार रुपये वर्षाचे भाडे होते. ऑक्टोबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या अखेरच्या वर्षाचे भाडे 7 लाख 29 हजार 657 रुपये आहे. त्यानुसार, सात एकर जागेचे प्रत्येक दिवसाला 2 हजार रुपये इतके नाममात्र भाडे आहे. पुष्पक अ‍ॅम्युजमेंट याच ठेकेदाराला अप्पूघरजवळील वॉटरपार्कही तब्बल 29 वर्षे भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. त्यासाठी दरवर्षी 9 लाख रुपये भाडे आहे. पहिल्या पाच वर्षांसाठी एक टक्के, दुसर्‍या पाच वर्षासाठी 1.25 टक्के, तिसर्‍या पाच वर्षासाठी 1.50 टक्के, चौथ्या पाच वर्षांसाठी 1.75 टक्के, पाचव्या पाच वर्षांसाठी 2 टक्के आणि शेवटच्या 4 वर्षांसाठी 2.25 टक्के भाडे दरात वाढ आहे. इतके कमी भाडे असूनही, ठेकेदाराने अनेक वर्षांचे भाडे महापालिकेकडे भरलेले नाही. तब्बल 83 लाख 37 हजार 95 रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दहा वर्षांपासूनची ही थकबाकी असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यासंदर्भात भूमी आणि जिंदगी विभागाने ठेकेदाराला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81 (1) अन्वये नोटीस बजावली आहे. मात्र, त्या नोटीशीला ठेकेदाराने कोणत्याही प्रतिसाद दिलेला नाही. तत्काळ भाडे न भरल्यास करारनामा रद्द करुन वॉटर पार्कची जागा ताब्यात घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मात्र, नोटीस देऊन वर्षभराचा कालावधी उलटूनही महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, ठेकेदाराने कोरोना महामारीच्या काळात वॉटर पार्क बंद असल्याने भाडे घेऊ नये, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. ती मागणी महापालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

थकबाकी भरण्याबाबत बजावली नोटीस

वॉटर पार्कचे सन 2025-25 अखेर 83 लाख 37 हजार 95 रुपयांची भाडे थकीत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. मुदतीमध्ये थकबाकीसह संपूर्ण भाडे न भरल्यास करारनामा रद्द करुन वॉटर पार्कची जागा ताब्यात घेण्यात येईल, असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे, असे भूमी आणि जिंदगी विभागाने सांगितले.

वॉटर पार्कच्या माध्यमातून लाखोंचा व्यवसाय

ठेकेदारांकडून वॉटर पार्क चालवले जात आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळणी तसेच, राईड्ससाठी प्रौढासह बालकांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. सुटीच्या दिवसात वॉटर पार्कला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ठेकेदाराला चांगले उत्पन्न मिळत आहे. असे असतानाही महापालिकेचे भाडे भरले जात नसल्याचे चित्र आहे. तसेच, भाडे थकवल्याने कारवाईही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तब्बल 5 कोटी 73 लाखांचा मालमत्ताकर थकीत

महापालिकेच्या दुर्गादेवी टेकडी येथील अप्पूघर आणि वॉटर पार्क पुष्पक अ‍ॅम्युजमेंट या ठेकेदार संस्थेला भाडे तत्त्वावर दिले आहे. बिगरनिवासी दराने त्यांचा मालमत्ताकर संबंधित ठेकेदारांने भरणे बंधनकारक आहे. सुरुवातीला ठेकेदाराने मालमत्ताकर नियमितपणे भरला. आत्ता, तब्बल 5 कोटी 73 लाख रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी ठेकेदाराने महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे केली होती. त्यानुसार, कर संकलन विभागाने राज्य शासनाकडे त्याप्रकरणी मार्गदर्शन मागितले आहे. मात्र, राज्य शासनाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराला मालमत्ताकर भरणे बंधनकारक आहे. शहरातील सामान्य नागरिकांचा मालमत्ताकर थकीत असल्यास तत्काळ मालमत्तेस सील लावले जाते. नळजोड तोडला जातो. मात्र, या ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशी परिस्थिती असतानाही सर्वसाधारण सभेने त्या थकबाकीदार ठेकेदाराला अप्पूघरसाठी आणखी 15 वर्षांची मुदतवाढ दिल्याने संताप तसेच, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विद्युत विभागाचे ओझे भूमी आणि जिंदगी विभागाकडे

महापालिकेच्या दुर्गादेवी टेकडी येथील अप्पूघर आणि वॉटर भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. हा करारनामा विद्युत विभागाने केला आहे. तब्बल 21 वर्षे तसेच, 29 वर्षांच्या दीर्घ भाडे तत्त्वावर हा करारनामा सन 2004 व सन 2005 ला करण्यात आला आहे. त्यानंतर ती जबाबदारी भूमी आणि जिंदगी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे करारनामा करताना अनेक त्रुटी असल्याचे अधिकारी आता कबूल करत आहेत. त्याप्रकरणी आता दोन्ही विभागांकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे.

ठेकेदारांसोबत महापालिकेचा करार

  • ठिकाण-क्षेत्रफळ-कराराचा कालावधी- सुरुवातीचे भाडे

  • अप्पूघर-7 एकर-21 वर्षांसाठी- 2 लाख 75 हजार रुपये

  • वॉटर पार्क-6350 स्क्वेअर मीटर -29 वर्षांसाठी- 9 लाख रुपये

अप्पूघर आणि वॉटर पार्क हे प्रकरण खूप जुने आहे. विद्युत विभागाने पूर्वी तो करारनामा केला आहे. त्यासंदर्भात माहिती घेण्यात येत आहे. अद्याप माझ्यापर्यंत त्या बाबत सविस्तर व पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी आणि जिंदगी विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT