पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील आठ ठिकाणी शुक्रवार (दि. 16) मतमोजणी प्रक्रियेस सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशिनमधील मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. तसेच, टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचा निकाल ध्वनिक्षेपकावर जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी दोनपर्यत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी शहरातील आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, अर्चना तांबे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, अर्चना पठारे, हिम्मतराव खराडे,अनिल पवार, नितीन गवळी, पल्लवी घाटगे यांच्या नियंत्रणाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आराखड्यानुसार मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणार्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचार्यांना पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
मतमोजणीच्या 10 ते 21 फेऱ्या होणार
एका प्रभागात किमान 39 ते कमाल 97 मतदान केंद्र आहेत. त्यानुसार मतमोजणीसाठी 3 ते 7 टेबलची व्यवस्था केली आहे. त्यानुसार किमान 10 ते कमाल 21 इतक्या फेर्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. टपाली मतदासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आला आहे.
समन्वयाने काम करा
मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.