Pimpri Chinchwad Traffic Violation File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Traffic Violation: सिग्नल केवळ शोभेलाच नाही! 'रेड लाईट जम्प' करणाऱ्या 58,962 चालकांकडून 4.93 कोटींचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवडमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई; लायसन्स रद्द होण्याची भीती, वाचा झेब्रा क्रॉसिंगचेही नियम

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीवरील नियंत्रण अधिक कठीण होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहतूक विभागाने मागील दहा महिन्यांत राबविलेल्या मोहिमेत 58 हजार 962 वाहनचालक सिग्नल जम्प करताना पकडले आहेत. त्यांच्याकडून 4 कोटी 93 लाख 24 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

वाहतूक नियमांना सिग्नल महत्त्वाचा

वाहतूक नियमनात महत्त्वाची भूमिका असलेल्या सिग्नलकडे अनेक दुचाकीस्वार दुर्लक्ष करत असून लाल दिवा असताना घुसखोरी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे अचानक समोर येणाऱ्या वाहनांना धडक देणे, दुचाकी घसरून पडणे, पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होणे, असे प्रकार घडत आहेत. शहरातील हिंजवडी, पिंपरी, वाकड, नाशिक फाटा, सांगवी, निगडी आणि भोसरी या प्रमुख चौकांमध्ये सिग्नल जम्पची प्रकरणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.

...तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द

सिग्नल जम्प केल्यास ई-चलनद्वारे दंड, तर पुनरावृत्ती झाल्यास चालकाचे लायसन्स निलंबनासाठी आरटीओकडे अहवाल पाठविला जातो. गंभीर प्रकरणांमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया केली जाते. शहरातील सर्वत्र बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नियमभंग करणाऱ्यांची ओळख पटविणे आता सुलभ झाले आहे. पुनरावृत्ती करणाऱ्या चालकांना विशेष मार्किंग करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असून वारंवार नियमभंग सिद्ध झाल्यास दीर्घकालीन लायसन्स निलंबन होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

झेबा क्रॉसिंगवर वाहने

झेबा क्रॉसिंगसंदर्भातही वारंवार नियमभंग होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. झेबा क्रॉसिंगच्या मागे थांबणे बंधनकारक असताना अनेक चालक पादचाऱ्यांच्या मार्गातच गाडी उभी करतात. पादचारी अपघातांमध्ये हा घटक महत्त्वाचा ठरत असल्याने वाहतूक शाखेने या प्रकरणांतही कठोर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, बाजारपेठांसमोरील क्रॉसिंगवर ही समस्या जास्त दिसून येत आहे. कोंडीत भर सिग्नल जम्प केल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. एक वाहन सिग्नल तोडून अनधिकृतपणे घुसले की मागील वाहनेही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे चौक जाम होतो. त्यामुळे दुतर्फा रांगा लागतात अन्‌‍ वाहतूक विस्कळीत होते. कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि सार्वजनिक वाहतूकही विस्कळीत होते. त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर होताना दिसत आहे.

सिग्नल पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. सिग्नल पाळणे सर्वांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. वाहतूक शिस्तबद्ध होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. स्मार्ट कॅमेऱ्यांमुळे कारवाई अधिक जलद आणि अचूक पद्धतीने होणार आहे.
डॉ. विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT