पिंपरी चिंचवड नाट्यगृह  pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpari Chinchwad: नाट्यगृहांतील कलादालने नावापुरतीच !

कलाप्रेमींसाठी कायमस्वरूपी दालनाची गरज

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या सांस्कृतिक मनोरंजनासाठी महापालिकेने वेगवेगळ्या भागांत नाट्यगृहांची उभारणी केली आहे. प्रत्यक्षात अजूनही त्याचा पुरेसा वापर होत नाही. प्रत्येक नाट्यगृहात कलादालन किंवा एक हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे सांगितले जात असले तरी मात्र, सर्वच नाट्यगृहांतील कलादालने केवळ नावापुरतीच असल्याचे पहायला मिळत आहे. (Latest Pimpari chinchwad news)

दोनच नाट्यगृहात कलादालन

कलादालनाच्या माध्यमातून शहराला सांस्कृतिक वारसा लाभण्यासाठी महापालिकेने चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पहिल्या मजल्यावर सुमारे एक हजार चौरस फूट जागेत कलादालन तयार केले आहे; परंतु नागरिकांना आणि कलाप्रेमींना नाट्यगृहात एक कलादालन आहे याविषयी माहिती नाही. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहातदेखील एक कलादालन आहे. मात्र, यात वर्षभरात दोन कार्यक्रम झाले आहेत. तसेच हे आडबाजूला असल्याने या कलादालनाचा कोणताही उपयोग होत नसल्याचे कलाप्रेमींचे म्हणणे आहे.

कलादालन म्हणजे काय ?

कलादालनामध्ये चित्र, शिल्प, विविध वस्तू, संग्राहकांच्या दुर्मिळ वस्तूंचे, दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित केली जातात. कलाकार प्रदर्शनांच्या माध्यमातून आपली कला नागरिकांसमोर सादर करतात. कलादालन अर्थात आर्ट गॅलरी म्हटले तर त्यात डिस्प्लेसाठी जागा लागते. त्यावर लाईट्स असावे लागतात. अशी सुविधा कोणत्याच नाट्यगृहातील कलादालनात नसल्याचे चित्र आहे. एखादी मोकळी जागा म्हणजे नाट्यगृहातील कलादालन म्हणता येणार नाही, असे शहरातील कलाप्रेमींचे म्हणणे आहे.

तीन नाट्यगृहांत कलादालनच नाही

आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरीतील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपळे गुरव येथील नटसम—ाट निळू फुले नाट्यगृहात कलादालनच नाही. यामध्ये फक्त छोट्या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध केले आहेत. ही नाट्यगृहे उभारण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; मात्र या नाट्यगृहांमध्ये कलादालनच उपलब्ध केलेले नाही. शहरातील कलाकारांनी कलादालन सुरू करण्यासाठी प्रस्ताव मांडले आहेत. शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कलादालनाची गरज असल्याचे कलाप्रेमींचे म्हणणे आहे.

शहरातील दोनच नाट्यगृहांमध्ये कलादालन उपलब्ध आहेत. इतर तीन नाट्यगृहांमध्ये कलादालने नाहीत. चिखली येथे नवीन टाऊन हॉल आहे. याठिकाणी एक कलादालन उपलब्ध केले आहे. कलादालनाबाबत कलाप्रेमींना व नागरिकांना माहिती नसल्यास आम्ही त्यासंदर्भात जनजागृती करू.
पंकज पाटील (सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT