Talegaon Midc Gas Leak Incident
पिंपरी : तळेगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान कार्बन डायऑक्साइड (CO2) गॅसची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर, एकावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी फेज-१ येथील शाफलर इंडिया कंपनीत घडली.
गौरीशंकर शर्मा आणि वैभव थोरात अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, प्रमोद जैस्वार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेच्या वेळी शाफलर कंपनीचे कर्मचारी कृष्णा साहू आणि सुशोभन पाखीरा हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनाही किरकोळ स्वरूपाचा त्रास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी येथील शाफलर इंडिया कंपनीतील अग्निशमन सिलिंडरच्या देखभाल आणि तपासणीचे काम उषा फायर सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. यावेळी गौरीशंकर शर्मा, वैभव थोरात, प्रमोद जैस्वार, कृष्णा साहू आणि सुशोभन पाखीरा हे काम करत होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन सिलिंडरमधून अचानक CO2 गॅसची गळती सुरू झाली. गॅसचा प्रादुर्भाव वाढल्याने तीन कर्मचारी बेशुद्ध पडले.
घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गैरीशंकर शर्मा आणि वैभव थोरात यांना तपासून मृत घोषित केले. प्रमोद जैस्वार यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर कंपनी परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, सुरक्षा उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.