Pimpri Chinchwad Stray Dog Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Stray Dog Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांवरून महापालिकेत गदारोळ; आठ महिन्यांत २० हजारांना चावा

सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल; कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्या कुत्र्यांकडून होणारे नागरिक, बालक व ज्येष्ठांवरील हल्ल्यावरून महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनावर एकच हल्लाबोल केला. ढीम्म प्रशासनाचे लक्तरे काढत अधिकाऱ्यांच्या कामकाजांवर ताशेरे ओढण्यात आले. सत्तारूढ पक्षाकडून आयुक्तांना थेट प्रतिकात्मक कुत्र्याची बाहुली भेट देण्यात आली. त्या गंभीर मुद्यावर सभागृहात तब्बल चार तास चर्चा रंगली.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. विषयपत्रिकेवर एकही विषय नसताना सत्तारूढ भाजपने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या मुद्यावरून चर्चेला तोंड फोडले. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आक्रमक भूमिका घेत भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली. भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग््रेाससह शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवला. या वेळी राजू मिसाळ यांनी प्रतिकात्मक कुत्र्याची बाहुली आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देत प्रशासनाचा निषेध नोंदवला. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मिसाळ यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सभागृहात केली.

आठ महिन्यांत 20 हजार जणांना घेतला चावा

राजू मिसाळ यांनी सांगितले, की निवडणुकीत प्रचार करत असताना आम्हाला नागरिकांनी कुत्र्यामुळे होत असलेल्या त्रासांच्या तक्रारी केल्या. त्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्कूल बसमधून मुले उतरत असताना त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या आठ महिन्यांत सुमारे 20 हजारांहून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची आकडेवारी आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटनाची गेल्या नऊ वर्षांतील आकडेवारी त्यांनी सभागृहात मांडली. ती आकडेवारी ऐकून सभागृह अवाक झाले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधातील सर्वच नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची आग््राही मागणी केली.

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

कुणाल वाव्हळकर यांनी वाकड परिसरात मोकाट कुत्र्यांची समस्या असल्याची तक्रार केली. पिंपरी गाव परिसरात मोकाट जनावरांचा त्रास असल्याची समस्या निकिता कदम यांनी मांडली. आशा सूर्यवंशी यांनी कचऱ्यांचे ढीग सर्वत्र असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. रावेत, किवळे, मामुर्डी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिका रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन नसल्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात इंजेक्शन घेण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे नीलेश तरस सांगितले. यासह अनेक नगरसेवकांनी कुत्र्यांच्या बंदोबस्ताची आग््राही मागणी लावून धरली.

चिखलीत बिबट्याची दहशत

चिखली भागात मोकाट कुत्री नाही, तर बिबट्याची दहशत वाढली आहे. त्यासाठी पथके नेमण्याची मागणी त्यांनी केली. बोपखेल परिरात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून, कुत्र्यांना खाण्यास घालणाऱ्या महिलांवर कारवाई करावी, अशी मागणी हिराबाई घुले यांनी केली. मोशी कचरा डेपो परिसरात कुत्री आणून सोडली जातात, असा आरोप सचिन तापकीर यांनी केला. राहुल कलाटे म्हणाले, की भुजबळ वस्तीत आज चार ते पाच जणांना कुत्रे चावले. असे प्रकार प्रभागात वारंवार घडत आहेत.

भष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना महामारी काळात भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात नसबंदी करण्यात आली, असे कागदोपत्री सांगितले जात आहे. तरीही शहरात कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. ही बाब गंभीर आहे. संबंधित भष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

गल्लीतील समस्या सभागृहात मांडण्याची शोकांतिका

कुत्रे चावण्याची गल्लीतील समस्या सभागृहात मांडली जात आहे, ही शहरासाठी शोकांतिका आहे. आमदार महेश लांडगे यांनी तो मुद्दा विधीमंडळ अधिवेशनात मांडला. त्यातून पिंपरी-चिंचवड शहराची नाहक बदनामी होत आहे. निव्वळ ढीम्म प्रशासनामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यास अपयश येत आहे. त्याला तेच जबाबदार आहेत, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केला. चर्चेनंतर महापौर रवी लांडगे यांनी शहरात आवश्यकतेनुसार मोकाट व भटकी कुत्री संगोपन केंद्र सुरू करावेत, असे आदेश आयुक्तांना दिले.

तातडीने उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे निर्देश

शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागास निर्देश देत आहे. कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना आवश्यक प्रमाणात खाद्य पुरविण्यात यावे. वर्दळीच्या ठिकाणी मोकाट कुत्री फिरू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांसंदर्भात तातडीने अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागास दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT