पिंपरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 20 फेबुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार (दि. 8) ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी -चिंचवड शहराचा निकाल 97.31 टक्के लागला. शहरामध्ये दहावीच्या परीक्षेस एकूण 19963 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 19912 विद्यार्थी बसले होते. यापैकी 19378 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मावळ तालुक्याचा निकाल 97.42 टक्के - मावळ तालुक्याचा निकाल 97.42 टक्के इतका लागला. तालुक्यामध्ये दहावीच्या परीक्षेस एकूण 5435 विद्यार्थी बसले होते. यापैकी 5215 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकाल लागताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या जल्लोषाला उधाण आले. दहावी बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली कसोटीची परीक्षा समजली जाते. त्यामुळे पहिल्याच वेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.
निकाल लागताच एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्येच निकाल पाहिला. आणि शाळांमध्ये प्रिंट घ्यायला विद्यार्थी शाळेत जमले होते. यावेळी मित्र - मैत्रिणींची गळाभेट घेवून जल्लोष केला.
निकाल लागल्यानंतर व्हॉटसॲप वरुन मेसेज फिरू लागले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी व नातेवाइकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शहारातील बेकरी, मिठाईच्या दुकानांत पेढे खरेदी करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली