उमेश सणस, संतोष महामुनी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पदपथांचा विकास केला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु, ज्या उद्देशाने विस्तृत पदपथ उभारले आहेत ते पादचाऱ्यांना वापरता येत आहेत का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज शहरातील कोणत्याही रस्त्यावरून प्रवास केला तर एकही पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून येत नाही. त्या पदपथांवर स्थानिक व्यावसायिक, पथारीवाले तसेच लहान मोठे हातगाडीवाले यांनी अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी अनधिकृत पार्किंगसाठी हे पदपथ वापरले जात आहेत. परंतु, महापालिकेचा संबंधित विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने पदपथ नेमका कोणासाठी, हा प्रश्न आहे. आयुक्त साहेब, नागरिकांनी चालायचे कुठून, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग शहरभर अतिक्रमण हटविण्याचे दावे करत असले, तरी प्रत्यक्षात कासारवाडीतील केशवनगर परिसरातील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अंतर्गत वर्दळीचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेला पदपथ मंडपाचे बांबू, खांब, वासे, लोखंडी सांगाडे, हातगाड्या आणि विविध व्यावसायिक साहित्याने अक्षरशः गिळंकृत केला असून, या गंभीर प्रकाराकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, सोसायटीतील रहिवासी तसेच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. "रस्ता वाहनांचा आणि पदपथ अतिक्रमणाचा, मग नागरिकांनी चालायचे कुठून?" असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्यालगत अनेक बैठी घरे तसेच गृहनिर्माण सोसायट्या आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवण्यात आले आहे, त्याच ठिकाणी एका सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे रहिवाशांना दररोज ये-जा करताना तसेच चारचाकी व दुचाकी वाहने बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या अतिक्रमणाचा थेट परिणाम होत असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मंडप उभारण्यासाठी वापरले जाणारे बांबू, खांब, वासे अक्षरशः रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर फ्लेक्स उभारण्यासाठी वापरले जाणारे १० बाय १० फुटांचे मोठमोठे लोखंडी सांगाडे पदपथावर उभे करण्यात आले आहेत. याशिवाय कुल्फीच्या गाड्या आणि लोखंडी हातगाड्यांचे सांगाडेही रस्त्यावर उभे असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून, पादचाऱ्यांसाठीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
महापालिकेच्या धोरणाला हरताळ
महापालिकेने शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्याचे धोरण जाहीर केले असले, तरी केशवनगर परिसरातील या प्रकाराकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून हीच परिस्थिती कायम असून, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अतिक्रमणांवर कारवाई कधी?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तातडीने कारवाई करून पदपथावरील मंडपाचे साहित्य, लोखंडी सांगाडे, हातगाड्या व इतर अडथळे हटवावेत, पादचाऱ्यांसाठी पदपथ तात्काळ मोकळा करावा आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केशवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. स्थानिकांच्या मते, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेवर राहील.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे पिंपळे गुरवमधील बहुतांश चौक आणि पदपथांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथाऐवजी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची वेळ येत आहे. तसेच काही नागरिक चारचाकी गाड्याही पदपथावर पार्किंग करतात. त्यामुळे पदपथ असून अडचण, नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती आहे. त्यामुळे पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौक, कृष्णा चौक, क्रांती चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, साठ फुटी रोड, डायनासोर गार्डन चौक, सृष्टी चौक, भगतसिंग चौक, जवळकरनगर, सुदर्शन चौक हे मुख्य चौक आहेत. येथील चौकातून सतत वाहनांची तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव स्मार्ट झाले; परंतु याच स्मार्ट पिंपळे गुरवमधील पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात दिवसेंदिवस सापडत चालले आहेत. भर चौकात चारही दिशेने रस्त्याच्या कडेला, पदपथावर अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालणेदेखील कठीण झाले आहे. रस्त्याच्या कडेला, पदपथाला लागून, पदपथावर नारळ पाणीविक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते यांच्या हातगाड्या, टेम्पो गर्दी करून लावलेल्या असतात. इतकेच नव्हे, तर अनेक परप्रांतीय दुकानदारांनी आपला माल अगदी पदपथावर मांडलेला असल्याने नागरिकांना पदपथ सोडून अक्षरश: जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. काही गॅरेज व्यावसायिकांनी स्वतःची दुकाने असूनसुद्धा ग्राहकांच्या दुचाकी वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी दुकानासमोरच असलेल्या पदपथाचाच सर्रास वापर करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पदपथ दिला जातोय भाडेतत्त्वावर
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर हातगाडी, स्टॉल तसेच इतर व्यावसायिकांसाठी त्या भागातील दादा, भाई भाडे वसूल करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याला महापालिकेच्या संबंधित विभागाचेदेखील अभय मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांचा पदपथावर हक्क आहे ते पादचारी मुख्य रहदारीच्या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तर अनेक ठिकाणी ज्यांची दुकाने चौकात, रस्त्याच्या कडेला आहेत ते पोट भाडेकरू ठेवून त्याच्याकडून भाडे वसूल करत आहेत. अनेकांनी आपल्या दुकानासमोरील पदपथ ठेल्यावाल्यांना, पाणीपुरी तसेच इतर व्यावसायिकांना पर-डे तत्त्वावर भाड्याने दिला असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
पदपथ कोणासाठी?
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी स्मार्ट पदपथ तयार केले आहेत. मात्र, भरचौकात रस्त्याच्या कडेला विक्रेते कुणाचीही तमा न बाळगता विक्री करीत असल्याने नेमका पदपथ कुणासाठी आहे? आम्ही पदपथावरून चालायचे की नाही? एकदा महापालिकेने सांगून तरी टाकावे. संबंधित प्रशासनाकडून अनेकदा अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईनंतर काही वेळातच व्यावसायिक पुन्हा पदपथ काबीज करतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भर चौकातील असणारे अतिक्रमण काढून पदपथ नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे करून द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.