Investment Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Investment Fraud: पिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणूक फसवणुकीचा सुळसुळाट; 44 लाखांचा गंडा

निगडी, रावेत आणि सांगवीत शेअर मार्केटच्या आमिषाने नागरिकांची लूट; पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: निगडी, रावेत आणि सांगवी येथे शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. या तीन प्रकरणांमध्ये 44 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून 15 लाख 91 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कीर्ताना बंगेरा नावाची महिला आणि विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका महिलेची 20 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 2021 पासून 2 एप्रिल 2026 या कालावधीत रावेत परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विवेक जगदेवराव शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने फिर्यादीला डिमॅट अकाऊंट उघडण्यास सांगून त्यातून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादीला स्वतःच्या खात्यातून फायदा होत नसल्याचे पाहून आरोपीने तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, मी माझ्या डिमॅट अकाउंटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला वेळेवर नफा देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या माध्यमातून एकूण 20 लाख 58 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. रावेत पोलिस तपास करीत आहेत. तिसऱ्या घटनेत ॲप डाऊनलोड करायला लावून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 9 लाख 7 हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ही घटना डिसेंबर 2025 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली.

याप्रकरणी एका फिर्यादीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कॅपिटल माँक्स कंपनीचे कर्मचारी जयेश पाटील, दोन महिला आरोपी आणि संबंधित लिंक व बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी फिर्यादीला एक लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि त्याद्वारे 9 लाख 7 हजार रुपये गुंतवणूक करायला लावली. पमध्ये ही रक्कम 90 लाखांवर गेल्याचे दिसत होते, मात्र ती काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद करून फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT