RMC Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri RMC Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणावर कारवाई; ४ आरएमसी प्रकल्प सील

धूळ नियंत्रण नियमांचे उल्लंघन; महापालिकेची तपासणी मोहीम तीव्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात कारवाई करण्यात येत असून, धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुनावळे, मोशी आणि पिंपळे सौदागर परिसरातील 10 आरएमसी प्रकल्पांची पाहणी केली. तपासणीदरम्यान 4 प्रकल्पांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव, तसेच कच्चा माल उघड्यावर साठविण्यात येत असल्याने धूळ प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. याअनुषंगाने मोशी येथील दोन आणि चिंचवड, पिंपळे सौदागर येथील प्रत्येकी एक प्रकल्पांना सील लावण्यात आले आहे.

दरम्यान, इतर प्रकल्पांना धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन न केल्यास पुढील टप्प्यात अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील आरएमसी प्रकल्पांसह बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांवर महापालिकेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पर्यावरण विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पुढे कठोर कारवाई करणार

प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ नियम बनविणे पुरेसे नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरएमसी प्रकल्पांमध्ये आवश्यक प्रदूषण नियंत्रण उपाययोजना न आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. पुढील काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT