Pimpri-Chinchwad Rain Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri-Chinchwad Rain: पावसामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या; महापौर रवी लांडगे यांचे आदेश

वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिक, वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे तसेच अपुऱ्या निचऱ्यामुळे पाणी साठले होते.

तसेच, यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिक, वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. त्यांची दखल घेऊन महापौर रवी लांडगे यांनी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

पहिल्याच अवकाळीत महापालिका नापास, खोदकामामुळे रस्ते चिखलमय, कर भरून नागरिकांना त्रास, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महापौरांनी वरील आदेश दिले आहेत.

महापौर लांडगे यांनी सांगितले, की शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत. रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. सुरू असलेली सर्व खोदकामे सुरक्षितरीत्या बंदिस्त करुन रस्ते पूर्वस्थितीत आणण्यावर भर द्यावा.

साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात करा. प्रमुख चौक, पूल, अंडरपास व सखल भागात विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख ठेवा. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा, यासाठी 24 बाय 7 नियंत्रण कक्ष सुरू करा.

कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटार स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करून त्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा तयार करा. विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करुन, रस्ते खोदकाम परवानग्यांवर कडक अंमलबजावणी करावी.

रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून घ्या. भूमिगत युटिलिटी डक्ट तयार करून वारंवार होणारी खोदकामे टाळा. सखल भागांमध्ये कायमस्वरूपी पंपिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करा.

नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवून नाल्यात कचरा टाकू नये म्हणून भर द्या. कामाचा दर आठवड्याला प्रगती आढावा सादर करावा आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश महापौर लांडगे यांनी आयुक्तांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT