बजरंग मासाळ
पिंपरी: रेल्वे प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या चिंचवड स्टेशन परिसरात क्वार्टर्स आहेत; मात्र क्वार्टर्समध्येच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची यंत्रणा असतानाही नियमित सफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. अनेक ठिकाणी झुडपे उगवली असून, त्यातून सापांचा वावर वाढल्याची तक्रार येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे कॉलनीतील सद्यस्थितीची 'पुढारी' प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत रहिवासी परिसरात अस्वच्छता, वाढलेले गवत-झुडपे, पाण्याचा योग्य निचरा योग्यपद्धतीने होत नसल्याचे दिसून आले; तसेच विविध ठिकाणी कंत्राटदारांची वाहने व बांधकाम साहित्य ठेवलेले असल्याचे निदर्शनास आले.
सापांची भीती
परिसरातील झाडेझुडपे वाढल्याने सापांचा वावर आढळून येत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. एकही दिवस असा जात नाही की, साप दृष्टीस पडत नाही, अशी भीती एका रहिवाशाने व्यक्त केली. धक्कादायक बाब म्हणजे, येथील एका मुलाच्या दप्तरात साप आढळल्याची घटना घडल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, या घटनेनंतर लहान मुलांना शाळेत पाठवतानाही पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
नियमित साफसफाईकडे दुर्लक्ष
रेल्वे क्वार्टर्सच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी यंत्रणा असतानाही नियमित सफाई होत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. गवत, झाडेझुडपे आणि कचरा वेळेवर हटवला जात नसल्याने परिसर अस्वच्छ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिसराच्या साफसफाईसाठी कंत्राटदार नेमला असून, त्याने नियमित काम केले नसल्यास रेल्वे प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई केली जाते का, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
परिसरातच पोकलेन अन् वाहने
क्वार्टर्स परिसरातच कंत्राटदारांची वाहने आणि पोकलेन ठेवण्यात आल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. रहिवाशांच्या वापरातील जागेत अवजड यंत्रसामग्री उभी केल्याने येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांची सतत वर्दळ असलेल्या परिसरात अवजड वाहने उभी करण्यासाठी कोणाची परवानगी आहे, तसेच त्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे का, असा प्रश्न रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.
पावसाचे पाणी थेट घरात
क्वार्टर्समधील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याची तक्रार. पावसाचे पाणी घराच्या दिशेने येत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. निचरा व्यवस्था प्रभावी नसल्यास पाणी साचणे, डासांचा प्रादुर्भाव आणि इमारतींच्या बांधकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पावसाळ्यात तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था करण्याची गरज असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
रेल्वेचे भंगारही वसाहतीतच
रेल्वे क्वार्टर्सच्या परिसरात गंजलेले लोखंडी साहित्य, राडारोडा आणि वापरात नसलेले साहित्य पडून असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. रहिवाशांच्या वर्दळीच्या ठिकाणीच असा राडारोडा पडून असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले खेळत असलेल्या परिसरात गंजलेले लोखंड आणि टाकाऊ साहित्य ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
क्वार्टर्स की दुर्लक्षित वसाहत
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची नियमित स्वच्छता, पाणी निचरा, परिसराची सुरक्षितता आणि देखभाल ही केवळ सुविधा नसून रहिवाशांच्या दैनंदिन सुरक्षिततेशी जोडलेली बाब आहे. सापांचा वावर, शाळकरी मुलाच्या दप्तरात साप आढळल्याची घटना, चोरीच्या तक्रारी, रहिवासी परिसरात उभी केलेली अवजड वाहने आणि घरात शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याची समस्या. या सर्व बाबी एकत्रितपणे पाहिल्यास रेल्वे क्वार्टर्सच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.
आमच्या परिसरात दररोज साप आढळून येतात. इथे आम्ही खेळतो; परंतु झाडाझुडपांमुळे साप कुठून येईल सांगता येत नाही. परिसराची नियमित स्वच्छता झाल्यास सापांचा वावर राहणार नाही.रहिवासी विद्यार्थिनी
रेल्वेचे भंगार सामान आणि वापरात नसलेले लोखंडी साहित्य वसाहतीतच पडून आहे. त्याकडे अनेकदा लक्ष वेधूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. परिसरात लहान मुले खेळतात, त्यामुळे या मुलांना दुखापत होण्याची भीती आहे. आधीच सापांचा वावर आणि अस्वच्छतेची समस्या आहे. अशा परिस्थितीत आम्ही कसे रहायचे.स्थानिक रहिवासी