पिंपरी: महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत एक जुलैपासून मालमत्ताकर वसुलीसाठी मोहीम तीव्र केली जाणार आहे. मालमत्ताकर थकविणार्या मालमत्ताधारकांना बिलवाटपासोबत जप्तीपूर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत. थकबाकीदाराविरोधात कारवाई केली जाणार आहे. निवासी मालमत्तांचे नळजोड तोडण्यात येणार असून, व्यावसायिक, बिगरनिवासी मालमत्तांची जप्ती केली जाणार आहे.
तीस जूनपर्यंत संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास सामान्यकरावर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्या मालमत्ताधारकांसाठी विविध प्रोत्साहनपर सवलती आहेत. करवसुलीला गती देण्यासाठी 1 जुलैपासून सर्व विभागीय कार्यालयांमध्ये विशेष वसुली पथके तयार करण्यात येणार आहेत.
वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणार्या निवासी मालमत्तांचे नळजोड तोडण्यात येणार आहे. कर भरून जप्ती व दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
35 जणांना जप्तीच्या नोटिसा
शहरातील 7 लाख 44 हजार 603 मालमत्तांची पालिकेकडे नोंद आहे. आजअखेर 370 कोटी रुपयांहून अधिक कर जमा झाला आहे. एकूण तीन लाख 39 हजारांहून अधिक नागरिकांनी कराचा भरणा केला आहे. एकूण 35 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त होऊनही कर न भरलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
मालमत्ताकर भरून कारवाई टाळावी
मालमत्ताधारकांना 30 जूनपर्यंत 10 टक्के सवलत आहे. या कालावधीत कर भरणार्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. मात्र, वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणार्या थकबाकीदारांवर 1 जुलैपासून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी मालमत्ताकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.