पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 14 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 800 कोटी 84 लाख रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, करसंकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे करसंकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप मालमत्ताकर न भरलेल्या थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन मालमत्ताकर लवकर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताकराची रक्कम एकरकमी भरल्यास 31 मार्चपर्यंत विलंब दंडाच्या रकमेवर तब्बल 90 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अवघे 17 दिवस शिल्लक राहिले आहेत.
शहरात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर एकूण 7 लाख 32 हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी 5 लाख 75 हजार 328 मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत असून, शहरातील नागरिकांकडून कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर जप्ती तसेच नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे.
कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन
शहरातील नागरिकांनी मालमत्ताकर वेळेत भरून महापालिकेच्या विकासकामांना मोठा हातभार लावला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि करसंकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, यामुळे 800 कोटींहून अधिक करसंकलन शक्य झाले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनीही अभय योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम भरावी, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
31 मार्चपर्यंत कर न भरल्यास जप्ती
अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर 90 टक्के सवलत दिल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ताकर भरलेला नाही त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा; अन्यथा नियमानुसार जप्ती व नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
विभागीय कार्यालयांतर्गत महसूल करसंकलन विभागाची 1 एप्रिल 2025 पासून ते 13 मार्च 2026 या कालावधीतील वसुली
वाकड : 101 कोटी 21 लाख रुपये
थेरगाव : 80 कोटी 56 लाख
चिखली : 66 कोटी 54 लाख
किवळे : 55 कोटी 46 लाख
कस्पटेवस्ती : 52 कोटी 37 लाख
भोसरी : 51 कोटी 85 लाख
चिंचवड : 50 कोटी 74 लाख
मोशी : 50 कोटी 34 लाख
पिंपरी वाघेरे : 45 कोटी 64 लाख
सांगवी : 40 कोटी 15 लाख
पालिका भवन : 37 कोटी 11 लाख
आकुर्डी : 36 कोटी 9 लाख
चऱ्होली : 31 कोटी 61 लाख
फुगेवाडी-दापोडी : 30 कोटी 83 लाख
दिघी-बोपखेल : 24 कोटी 9 लाख
तळवडे : 21 कोटी 9 लाख
निगडी-प्राधिकरण : 17 कोटी 99 लाख
पिंपरी कॅम्प : 7 कोटी 17 लाख रुपये