PCMC Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Property Tax: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत विक्रमी भर! सहा महिन्यांत ६१० कोटी ४४ लाखांचा मालमत्ताकर जमा

५ लाख ९ हजार २०० मालमत्ताधारकांनी भरला कर; वाकड विभाग ८४ कोटी ९१ लाखांच्या वसुलीसह अव्वल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महापालिकेच्या करसंकलन विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षातील एक एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या पहिल्या सहामाहीत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 610 कोटी 44 लाखांचा मालमत्ताकर वसूल केला आहे.

पहिल्या सहामाहीत विविध करसवलतींचा लाभ घेत कर भरणार्‍यांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. यंदा 7 लाख 66 हजार मालमत्ताधारकांपैकी 5 लाख 9 हजार 200 जणांनी म्हणजे तब्बल 66.47 टक्के मालमत्ताधारकांनी बिल भरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 7 लाख 66 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. गेल्या वर्षी करसंकलन विभागाने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटिसा, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह महिला बचत गटांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ताकराची रक्कम व सवलतीची रक्कम सांगणारा एसएमएस पाठवला जात होता. यामुळे पहिल्या सहा महिन्यांत कर भरणार्‍यांचा आलेख वाढला आहे.

गतवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत 4 लाख 78 हजार 268 मालमत्ताधारकांनी 603 कोटी रुपयांचा भरणा केला होता. यंदा 5 लाख 9 हजार 200 मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत बिल भरले आहे. त्यांनी तब्बल 610 कोटी 44 लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. गतवर्षापेक्षा 6 कोटी 62 लाख रुपयांची अधिकची वसुली झाली आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

सर्वाधिक कर वसूल करण्यास वाकड विभाग पुन्हा अव्वल

महापालिकेची 18 विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. यामध्ये वाकड करसंकलन कार्यालयाने सर्वाधिक तब्बल 84 कोटी 91 लाख रुपयांचा मालमत्ताकर वसूल केला आहे. त्यापाठोपाठ थेरगाव 53 कोटी 15 लाख तर, कस्पटे वस्ती कार्यालयाने 45 कोटी 19 लाख रुपयांचा मालमत्ताकर जमा केला आहे.

किवळेतून 44 कोटी 91 लाख, पिंपरी कॅम्प 44 कोटी 99 लाख, चिखली करसंकलन कार्यालयाने 44 कोटी 61 लाख कर जमा केला आहे. तर, सर्वांत कमी तळवडे कार्यालयाने 11 कोटी 99 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे.

मालमत्ताकर भरणार्‍या नागरिकांचे आभार

मालमत्ताकर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीत प्रथमच 610 कोटींचा कराचा भरणा झाला आहे. यापुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून करवसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

थकबाकी वसुलीवर आता भर

मालमत्ताकर संकलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करसंकलन विभागाच्या वतीने सातत्याने नियोजन करण्यात आले. करदात्यांना सवलतीचा लाभ घेता यावा व कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली.

त्यामुळेच सहा महिन्यांत 66.47 टक्के मालमत्ताधारकांनी भरणा केला आहे. पुढील 6 महिन्यांत उर्वरित 33.52 टक्के मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर व चालू कर 100 टक्के वसुलीवर भर दिला जाणार आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT