Air Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Air Pollution: प्रदूषण करणारे 14 आरएमसी प्लान्ट सील; महापालिकेकडून 22 प्लान्टची तपासणी

ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वायू व ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण करणाऱ्या रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लान्टची तपासणी करून, महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून 14 प्लान्टवर कारवाई करण्यात आली. ते प्लान्ट सील करण्यात आले आहेत. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आरएमसी प्लान्टची डोकेदुखी वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक बेजार, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने 19 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. प्रदूषण करणाऱ्या प्लान्टवर ठोस कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन पर्यावरण विभागाने शहरातील आरएमसी प्लान्टची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांमार्फत शहरातील आरएमसी प्लान्टची तपासणी मोहीम राबविण्यात आली. एकूण 22 आरएमसी प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या 14 प्लान्टवर तात्काळ कारवाई करत त्यांना सील करण्यात आले. यामध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या.

उर्वरित प्लान्टमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींनुसार संबंधितांना कडक इशारा देण्यात आला आहे. हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली तातडीने बसविणे, पाण्याची नियमित फवारणी करणे, संपूर्ण प्लान्टभोवती शेड उभारणे, धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे याबाबी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. औद्योगिक तसेच, बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा कारवायांना पुढील काळातही अधिक गती दिली जाणार आहे, असे पर्यावरण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरएमसी प्लान्टचालकांनी नियमांचे पालन करावे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑरेंज वर्गवारीनुसार सर्व परवानग्या घेणे बंधनकारक आहे. शाळा, रुग्णालये, न्यायालये यांपासून 200 मीटर व निवासी भागापासून किमान 50 मीटर अंतर राखावे. संपूर्ण प्लान्ट बंदिस्त व कच्चा माल, सिलो, कन्वेयर, लोडिंग-अनलोडिंग व मिक्सिंग युनिट आच्छादित ठेवणे बंधनकारक आहे.

नियमित पाणी फवारणी, धूळ संकलन प्रणाली व हरित पट्टा निर्माण करणे अनिवार्य आहे. पक्के अंतर्गत रस्ते, नियमित साफसफाई व सर्व स्थानांतरण बिंदू बंदिस्त ठेवणे आवश्यक आहे. टायर धुण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस प्रणाली अनिवार्य आहे. वाहने स्वच्छ करूनच बाहेर सोडावीत. कच्चा माल बंदिस्त ठिकाणी ठेवणे.

कन्वेयर बेल्ट झाकलेले असणे आवश्यक आहे. वायू प्रदूषण नियंत्रणाच्या पीएम 10 व पीएम 2.5 मानकांचे पालन करणे बंधनकारक आहे. सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर अनिवार्य आहे. तसेच ते इतरत्र सोडण्यास मनाई आहे. ध्वनी व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. औद्योगिक क्षेत्राबाहेरील प्रकल्प सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच कार्यान्वित असावेत.

शहरातील वायू प्रदूषण कमी करणार

शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. बांधकाम व औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रदूषण करणार्या घटकांवर सातत्याने कारवाई करून शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

प्रदूषण करणाऱ्या आरएमसी प्लान्टवर गुन्हे दाखल करणार

शहरातील आरएमसी प्लान्ट आणि बांधकाम प्रकल्पांनी बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. नियमभंग करणार्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही अशी तपासणी मोहीम राबवून प्रदूषण कंवर कठोर कारवाई केली जाईल. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT