पिंपरी: महायुतीतील भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये फोडाफोडीचे सत्र सुरू झाले आहे. भाजपाच्या माजी दोन नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे तब्बल 11 माजी नगरसेवक आपल्या छत्रछायेत घेत राजकीय भूकंप घडविला आहे. या घाऊक पक्षांतराने फेबुवारी 2017 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती शहरवासीयांच्या समोर आली आहे. या फोडाफोडीवरून भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षात सत्तेसाठी मोठा संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे.
सत्तेतील राष्ट्रवादी काँग््रेासचे असंख्य सक्षम नगरसेवक फोडत भाजपाने पिंपरी-चिंचवड शहरात पाय रोवले. त्या ताकदीवर तसेच, मोदी लाटेत भाजपाने फेबुवारी 2017 ची निवडणुकीत 128 पैकी 77 जागांवर विजय मिळत महापालिकेची सत्ता एकहाती काबीज केली. सत्तेतून पायउतार होत, राष्ट्रवादीला प्रथमच विरोधी बाकावर बसावे लागले. शहरात राष्ट्रवादी आणि भाजपा हे एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीत असूनही त्यांचे एकमेकांशी फारसे सख्य नाही. ते अनेक जाहीर कार्यक्रमांतून तसेच, घटनांतून समोर आले आहे.गल्लीपासून दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाने यंदा पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शंभरपेक्षा अधिक जागांवर विजयाचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे स्पष्ट केले. त्या विधानाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांना पक्षात घेतले.
महायुतीतच फोडाफोडी सुरू झाल्याने भाजपाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे दिग्गज असे 11 माजी नगसेवक फोडले. राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात होते. त्या संदर्भात ‘पुढारी’ने ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. ते वृत्त खरे ठरले आहे. ते माजी नगरसेवक अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओखळले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या फळीतील इच्छुकांना उमेदवारी देऊन निवडणुकीस सामोरे जाण्याची वेळ पक्षावर आली आहे. परिणामी, राष्ट्रवादीचे विजयाचे मनसुबे धुळीस मिळू शकतात.
मतदार त्यांना धडा शिकवतील
विजयी होणार नाही म्हणून त्यांनी मतदारांवर अविश्वास दाखविला. त्यांची ही पद्धत अयोग्य आहे. त्यांना पक्ष तिकीट देणार होते. अजित पवारांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांना प्रचार सुरू करण्यास सांगण्यात आले होते. ते इतर पक्षात जाणार असल्याची कुणकुण आम्हांला होती. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता. मात्र, तो बोलणे टाळत होते. त्यांना मतदार धडा शिकवतील, असे राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.
भाजपाचा विजयाचा निर्धार
महापालिका निवडणुकीसाठी शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला. त्या सर्वाचे सर्व भाजपा परिवारात स्वागत करतो. देव, देश, धर्म व संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून भाजपाचा विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
शहर विकासाची घोडदौड कायम राहणार
पिंपरी-चिंचवड शहरात हाताला रोजगार मिळतो. दुसरीकडे अत्याधुनिक सुविधा या शहराने नागरिकांना दिल्या आहेत. शहर आज प्रगतीच्या उंचीवर पोहोचले आहे. येथील प्रत्येक नगरसेवक, पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि वेळप्रसंगी विरोध बाजूला ठेवून शहर विकासाची भूमिका घेतली. अशीच भूमिका शहर प्रगतीपथावर राहावे, यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या येथील प्रत्येकाने घेतली आहे. आगामी काळात या सर्वांच्या सोबतीने शहर विकासाची घोडदौड कायम ठेवली जाईल, असे निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.