Death Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Unidentified Bodies: पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीची खाकी! बेवारस मृतदेहांना पोलिसांकडून सन्मानाचा अखेरचा निरोप

पावणेसहा वर्षांत सुमारे ६५० अनोळखी मृतदेहांची नोंद; दर तीन दिवसांनी एक बेवारस मृतदेह आढळत असल्याचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारी खाकी वर्दी आता बेवारस मृतदेहांचा ‘वारस’ बनत आहे. मृत्यूनंतर ज्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी हक्काचे माणूसही पुढे येत नाही अशा व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या पावणेसहा वर्षात तब्बल पावणेसातशे बेवारस-अनोळखी मृतदेहांची नोंद झाली आहे. यातील ओळख न पटलेल्या आणि नातेवाइकांनी स्वीकारण्यास नकार दिलेल्या मृतदेहांवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात रोजगाराच्या निमित्ताने राज्यासह देशाच्या विविध भागांतून नागरिक येतात. यातील अनेक जण कुटुंबापासून दूर राहतात. अशा व्यक्तींचा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. मृत व्यक्तीकडे ओळखपत्र अथवा अन्य कोणताही पुरावा नसल्यास तपासाची गुंतागुंत आणखी वाढते. अशा परिस्थितीत मृत व्यक्ती कोण, ती शहरात कशासाठी आली होती, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतची प्रक्रिया पोलिसांना पार पाडावी लागत आहे.

शहरातील नदीपात्र, नाले, कचऱ्याचे ढीग, रस्ते, पदपथ, शेत, विहिरी तसेच निर्मनुष्य ठिकाणी अनोळखी मृतदेह आढळून येतात. घर सोडून गेलेले वृद्ध, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती, निराधार नागरिक, परप्रांतीय कामगार आणि प्रवासादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींचाही यामध्ये समावेश असतो. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र, त्यानंतरही वारस मिळत नसल्यास स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार केले जात आहेत.

रक्ताच्या नात्यांनीही फिरवली पाठ

काही प्रकरणांत पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश येते. नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना मृत्यूची माहितीही दिली जाते. मात्र, कौटुंबिक कलह, नातेसंबंधांतील दुरावा अथवा अन्य कारणांमुळे काही जण मृतदेह ताब्यात घेण्यास तयार होत नाहीत. जिवंतपणी दुरावलेली नाती मृत्यूनंतरही जवळ येत नाहीत. अशा वेळी संबंधित व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारी पोलिस स्वीकारतात.

अंत्यसंस्कारापूर्वी तपासाची कसोटी

अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलिसांना अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक आहे, अपघाती आहे, आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेतला जातो. हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अन्य ठिकाणी आणून टाकला आहे का, याचीही तपासणी केली जाते. घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहावरील जखमा आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाते.

कधी कुजलेला मृतदेह, तर कधी केवळ सांगाडा

निर्जन ठिकाणी मृतदेह पडून असल्याचे अनेकदा उशिराने निदर्शनास येते. तोपर्यंत मृतदेहाची अवस्था बदललेली असते. काही घटनांमध्ये पोलिसांच्या हाती केवळ सांगाडा लागतो. अशा प्रकरणांत मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक तपासाची मदत घ्यावी लागते. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींशी पडताळणी केली जाते.

अंतिम प्रवासात सामाजिक संस्थांची साथ

बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांना सामाजिक संस्थांकडूनही सहकार्य मिळते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून अंत्यविधी केले जातात. मृत व्यक्तीची जात, धर्म, आर्थिक परिस्थिती अथवा सामाजिक प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन तिला सन्मानाने अंतिम निरोप देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठीही कोणी नसते, तिच्या अंतिम प्रवासात अनोळखी माणसेच आप्तस्वकीयांची भूमिका बजावतात.

अंत्यसंस्कार झाले तरी ओळखीची आशा कायम

अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची छायाचित्रे, अंगावरील कपडे, शरीरावरील विशिष्ट खुणा, वैयक्तिक वस्तू आणि अन्य आवश्यक पुराव्यांची नोंद पोलिस दप्तरी ठेवली जाते. भविष्यात एखादे कुटुंब आपल्या बेपत्ता सदस्याचा शोध घेत पोलिस ठाण्यात आल्यास या नोंदींचा आधार घेतला जातो. अंत्यसंस्कारानंतरही मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा मार्ग खुला राहावा, यासाठी ही खबरदारी घेतली जाते.

दर तीन दिवसांनी एक अनोळखी मृतदेह

सन २०२१ ते सन २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दर तीन दिवसांनी सरासरी एक बेवारस-अनोळखी मृतदेह आढळून आल्याची नोंद आहे. सन २०२५ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक होते. त्या वर्षात तब्बल १४७ मृतदेहांची नोंद झाली. यंदाही १०० च्या पुढे मृतदेह आढळून आले आहेत.

अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नियमानुसार कार्यवाही केली जाते. बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी, उपलब्ध तांत्रिक व वैज्ञानिक साधनांचा वापर तसेच अन्य पोलिस ठाण्यांशी समन्वय साधून ओळख निश्चित करण्याचे प्रयत्न केले जातात. सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वारस न मिळालेल्या मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात. कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT