संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याबाबत चुकीची माहिती देणे, कार्यक्षेत्राबाहेर जाऊनही त्याची माहिती न देणे अथवा वरिष्ठांना दिशाभूल करणे आता महागात पडणार आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला असून, आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचालींवर नियंत्रण कक्षातून थेट लक्ष ठेवले जाणार आहे. दररोज सकाळी साडेनऊ आणि सायंकाळी साडेआठ वाजता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली जाणार असून, खोटी अथवा अपूर्ण माहिती देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
कामकाजावर राहणार प्रभावी नियंत्रण
कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, तपास आणि प्रशासकीय कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी तातडीने उपलब्ध राहावेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची अद्ययावत माहिती नियंत्रण कक्षाकडे नियमितपणे उपलब्ध राहणार आहे.
त्यासाठी दिवसातून दोन वेळा खातरजमा करून त्याची नोंद स्वतंत्रपणे जतन केली जाणार आहे. एखादा अधिकारी संपर्काबाहेर असल्यास, उपलब्ध नसल्यास किंवा दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिस आयुक्त आणि संबंधित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.
तथ्य लपविणे, चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे, नियंत्रण कक्षाच्या सूचनांना प्रतिसाद न देणे किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन मानले जाणार आहे. रजा, रुग्णालयीन उपचार, विशेष बंदोबस्त, न्यायालयीन कामकाज, तपास, प्रशिक्षण, शासकीय बैठक किंवा अन्य कारणासाठी अधिकारी कार्यक्षेत्राबाहेर जाणार असल्यास त्याची पूर्वकल्पना नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक राहणार आहे. संबंधित कामकाज पूर्ण झाल्यानंतर नियमित कर्तव्यावर रूजू झाल्याची नोंदही करावी लागणार आहे.
अपरिहार्य परिस्थितीत वरिष्ठांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक
अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्याशी संबंधित आरपीआय यांपर २४ तास सतर्क राहून वरिष्ठ कार्यालयांना आवश्यक माहिती तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रादेशिक विभागांचे अपर पोलिस आयुक्त त्यांच्या अखत्यारीतील पोलिस ठाणे, विभाग आणि परिमंडळ कार्यालयांमधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा नियमित आढावा घेणार आहे.
कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या अधिकाऱ्यांची कारणमीमांसा करून आवश्यक पर्यवेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गुन्हे शाखा, विशेष शाखा, मुख्यालय आणि वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर संबंधित अपर पोलिस आयुक्तांनी नियमित लक्ष ठेवायचे आहे. पोलिस निरीक्षकांपासून ते सहायक पोलिस आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय अथवा कार्यक्षेत्र सोडता येणार नाही. अपरिहार्य कारण असल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळाचे होणार नियोजन
कायदा व सुव्यवस्था, गंभीर गुन्हे, व्हीआयपी बंदोबस्त किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी तातडीने उपलब्ध राहावेत, यासाठी सर्वांनी मोबाईल क्रमांक कार्यरत ठेवून संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यवस्थेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळाचे नियोजन, समन्वय आणि प्रतिसाद क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि उपलब्धता यावर प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक आहे. नियंत्रण कक्षाकडे अद्ययावत माहिती उपलब्ध असल्यास कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने निर्णय घेणे अधिक सुलभ होईल.- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड