PCMC Cashless Hospital Facility: पिंपरी-चिंचवड मनपा रुग्णालयात कॅशलेस सुविधेचा अभाव

रोकड भरण्यासाठी धावपळ; रुग्णांचे हाल
PCMC Cashless Hospital Facility
PCMC Cashless Hospital FacilityPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वच रुग्णालये कॅशलेस सुविधेअभावी मागे पडली आहेत. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात रोख पैसे भरुनच केसपेपर, बिलाची रक्कम जमा करावी लागते. कॅशलेस सुविधा नसल्याने रुग्ण नातेवाईकांची धावपळ होत आहे.

वायसीएम, थेरगाव रुग्णालयातच कॅशलेस सुविधा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1 एप्रिल 2025 पासून पेपरलेस कामकाज सुरू झाले आहे. यापुढे प्रशासनात फाईल किंवा प्रस्ताव कागदोपत्री न स्वीकारण्याची भूमिका तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी घेतली होती.

PCMC Cashless Hospital Facility
Pimpri Chinchwad Bribe Case: सत्तर हजारांची लाच घेताना बीट निरीक्षकाला अटक

मात्र, महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार सुरू करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही, वर्षाभरात फक्त वायसीएम आणि थेरगाव रुग्णालयातच कॅशलेस सुविधा उपलब्ध झाली आहे. इतर ठिकाणी रुग्ण व त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होते.

रुग्णांना नाहक त्रास

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना केसपेपर काढण्यासाठी तसेच बिलिंग काउंटरवर कॅशलेस सुविधा नसल्यामुळे रोख स्वरुपात शुल्क भरावे लागते. अनेकदा नागरिकांकडे सुटे पैसे नसल्यास कर्मचारी त्यांच्या सोयीसाठी पेपर देतात.

मात्र, उरलेले पैसे देण्यासाठी काउंटरवर सुटे पैसे उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागते. काही वेळा औषधे घेण्यासाठी पुन्हा सुट्या पैशांची आवश्यकता भासते. परिणामी नागरिक काउंटरवरच थांबतात किंवा जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली, बिस्किटे घेऊन सुटे पैसे मिळवतात. यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.

पेपरलेसचा दावा ठरला खोटा

जवळचे उपहारगृहचालक ऑनलाइन पेमेंट केल्यावर आपल्याला रोख पैसे देईलच याची खात्री नसते. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटचा निर्णय महापालिकेने लवकर घ्यावा, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून जोर धरू लागली आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार प्रणाली सुरू झाल्यास नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकतील, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

PCMC Cashless Hospital Facility
Wakad Snake Rescue: वाकडमध्ये साडेचार फुटी नागिणीसह १४ पिल्लांचे यशस्वी रेस्क्यू; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता

शासकीय, निमशासकीय सर्वच क्षेत्रात रोखीच्या व्यवहाराऐवजी कॅशलेस व्यवहार करण्यास आता प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालय, दवाखान्यांमध्ये कॅशलेस व्यवहाराचा पर्याय प्रशासनाकडून दिलेला नाही. केसपेपर, उपचार बिलाची रक्कम जमा करताना रोख पैसे नसल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. पेपरलेस आणि स्मार्ट कारभाराचा दावा करणारे महापालिका प्रशासन रुग्णालयांमध्ये कॅशलेस बिलिंग अद्याप मागे असल्याचे दिसून येत आहे.

कॅश काउंटरवर वादाचे प्रसंग

महापालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतात. मात्र, सर्व रुग्णालयात रुग्णांच्या उपचारांचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्याची व कॅशलेस व्यवहाराची सुविधा नाही. त्यामुळे अनेकवेळा रुग्णांकडे रोख पैसे नसल्याने वादा-वादीचे प्रसंग घडता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कॅशलेस आणि डिजिटल व्यवहार सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अनेक रुग्णालयाच्या बाहेर एटीएमची सुविधा नाही

रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याची कागदपत्रे आणि त्याचे बिलिंग करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा नसल्याने याठिकाणी बिल करताना मोठी अडचण येते. रोख रक्कम भरायची असल्याने नातेवाईकांना पळापळ करावी लागते. रुग्णालयाच्या बाहेर एटीएमचीदेखील सुविधा नसते. अशा वेळी लांब जाऊन एटीएममधून रोख पैसे घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत वेळ जातो.

घटना क्रमांक 1

मी तालेरा रुग्णालयात उपचारासाठी आलो; पण याठिकाणी अगदी केसपेपरपासून ते बिलिंगपर्यंत सर्व व्यवहार रोख रकमेने करावे लागतात, हे माहिती नव्हते. दहा रुपयांचा केसपेपर काढण्यासाठी बाहेर दुकानात जावून काहीतरी वस्तू खरेदी करुन सुटे पैसे करावे लागले आणि यानंतर केसपेपर काढला. यात आजारी माणासाचे हाल होतात. त्यामुळे महापालिकेने ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था केली पाहिजे, असे अंनत कारंडे यांनी सांगितले.

घटना क्रमांक 2

मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला; पण बिलिंग काउंटरवर बिल भरल्यानंतर उरलेले पैसे घेण्यासाठी सुटे पैसे उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागली. हेच ऑनलाइन पेमेंटची सोय असती तर लगेच बिल भरून घरी गेलो असतो, कावेरी पोळ यांनी सांगितले.

महापालिकेच्या वायसीएम आणि थेरगाव रुग्णालयात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. इतर रुग्णालयांत कॅशलेस सेवा नाही. एकापाठोपाठ एक रुग्णालयात कॅशलेस सुविधांचे काम करण्यात येईल. अद्याप तरी प्रस्तावित आहे.

- डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

वायसीएममध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी इंटरनेटच्या रेंजची समस्या आहे. कॅश काउंटर रुग्णालयाच्या आत असल्याने नातेवाईकांना स्कॅनर स्कॅन केल्यानंतर बाहेर जावून पेमेंट करावे लागते. कधी कधी पेमेंट फेलदेखील होते.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news