Palm Sunday Celebration Pudhari
पिंपरी चिंचवड

Palm Sunday Celebration: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘होसान्ना’चा जयघोष; पाम संडे उत्साहात साजरा

झावळ्यांच्या मिरवणुकीतून पवित्र सप्ताहाची सुरुवात; चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि संदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील ख्रिस्ती बांधवांनी रविवार (दि. 29) हातात झावळ्या घेवून व ‌‘होसान्ना होसान्ना‌’ चा जयघोष करत पाम संडे (झावळ्याचा रविवार) साजरा केला. ख्रिस्ती लोक या रविवारी हातात झावळ्या आणि त्याच्या अणकुचीदार पानांपासून बनविलेले क्रूस घेऊन मिरवणूक काढतात. ‌‘होसान्ना होसान्ना‌’ म्हणून जयघोष करण्यात आला. ईस्टरपूर्वी येणाऱ्या रविवारलाच झावळ्याचा रविवार असे म्हणतात. याच दिवसापासून पवित्र सप्ताहाची सुरुवात होते.

यादिवशी झावळ्याचा रविवार याविषयी मंदिरात संदेश दिला जातो. शहरातील दापोडीतील विनियार्ड वर्कस चर्च, चिंचवडमधील सेंट झेवियर, पिंपरीतील अवर लेडी कोन्सिल चर्च आणि इतर छोट्या मोठ्या चर्चेसमध्ये ख्रिस्ती बांधवांनी हातात झावळ्या घेवून मिरवणूक काढली. चर्चमध्ये धर्मगुरुंनी पाम संडेवर आधारित संदेश दिला.

येशू बेथानी या गावावरून यरूसलेमला यायला निघाले. ही वार्ता सर्वत्र पसरल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी खजुरीच्या झावळ्या व स्वत:चे अंगावरचे कपडे पसरविले आणि होसान्ना, होसान्ना म्हणजेच परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादीत असो असा जयघोष केला. खजुरीच्या झावळ्यांनी विजयी वीराचे स्वागत करण्याची पद्धत इस्राएलमध्ये होती. लोक जल्लोष करीत वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरूसलेमच्या मंदिरात जात असत.

त्याचीच आठवण आणि प्रतिक म्हणून पाम संडे साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मातील लेंटचा महिना संपण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी राहिला आहे. पाम संडे पासून त्यांच्या पवित्र साप्ताहाला सुरूवात होत आहे. पुढील सात दिवस प्रभू येशूचे स्मरण केले जाते.

या आठवड्यात अंजिराचा सोमवार, मौदी गुरुवार, गुडफायडे आणि ईस्टर हे ख्रिस्ती धर्मियांना महत्त्वाचे दिवस येतात. या आठवड्यात येशू ख्रिस्ताला सर्वाधिक यातना भोगाव्या लागल्या म्हणून त्याला पवित्र सप्ताह म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT