मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकूण 128 जागांची आरक्षण सोडत मंगळवार (दि. 11) घोषित झाल्याने सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जागा सुटली किंवा नाही सुटली तरी, आपली उमेदवारी म्हणजे तिकीट फिक्स करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी नेतेमंडळी व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना गळ घालण्यात येत आहे. तिकीट मिळेपर्यंत मोर्चेबांधणी केली जात आहे. इच्छुकांच्या या घडामोडींमुळे शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
सोडतीमुळे अनेक जागांवरील आरक्षण बदलले आहे. जागा नसल्याने प्रभागातील इतर जागेवर किंवा दुसऱ्या प्रभागात लढण्याचा निर्धार अनेक इच्छुकांनी केला आहे. कोणत्याही स्थितीत यंदा लढायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. तिकीट मिळविण्यासाठी स्थानिक खासदार, आमदार तसेच, मुंबईतील नेतेमंडळींची भेट घेण्यात येत आहे. त्यांना साकडे घालण्यात येत आहे. मीच कसा योग्य, माझा पक्षाला किती फायदा, हे त्यांना पटवून दिले जात आहे. तिकीट फिक्स करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कलही लढविल्या जात आहेत. मला नाही, तर माझ्या पत्नीस उमेदवार देण्याची गळ इच्छुकांकडून घातली जात आहे.
अनेक प्रभागात खुल्या सर्वसाधारण गटात महिला आरक्षण पडले आहे. तसेच, ओबीसीचे आरक्षण पडले आहे. त्या आरक्षणामुळे राजकीय गडांतर येऊ नये, म्हणून अनेकांनी यापूर्वीच कुणबी दाखले काढले आहेत. आरक्षणामुळे फटका बसू नये, म्हणून अगोदर अनेक माजी नगरसेवक व इच्छुकांनी कुणबी जातप्रमाणपत्राची तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी गटातून निवडणूक लढता येणार आहे. तसेच, इच्छुक महिलांनाही ओबीसी गटातून निवडणूक मैदानात उतरता येईल. कुणबीचा दाखला अनेकांना मोठा दिलासा देत आहे. मागील निवडणुकीत अनेकांनी या जातप्रमाणपत्राचा आधार घेतला होता.
प्रभागातील चारही जागांचे चित्र स्पष्ट झाल्याने कोणत्या जागेवर लढायचे हे इच्छुकांनी फिक्स केले आहे. तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे फेऱ्या मारल्या जात आहेत. खासदार, आमदार, माजी आमदार, शहराध्यक्षांच्या भेटी घेतल्या जात आहेत. तसेच, मुंबईत पक्षश्रेष्ठी व नेत्यांची भेट घेण्यात येत आहे. जागा सुटली असून, तिकिटासाठी गाऱ्हाणे घातले जात आहे. तसेच, वेगवेगळ्या माध्यमातून नेतेमंडळीकडे आपल्या नावाची शिफारस केली जात आहे.
पक्षाची उमेदवारी न दिल्यास अनेकांनी अपक्ष लढण्याचा निर्णय पक्का केला आहे. कोणत्याही स्थितीत यंदा लढायाचे हा निर्धार अनेकांनी केला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष मैदानात राहण्याचा निश्चय जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी समर्थक व कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत.
महापालिका भवन तसेच, क्षेत्रीय कार्यालयात माजी नगरसेवकांसह इच्छुकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. प्रभागातील वेगवेगळी कामे घेऊन अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. रस्त्त्यांवरील खड्डे, पाणीटंचाई, अस्वच्छता, ड्रेनेज तुंबणे, धोकादायक झाडे, भटक्या कुत्र्यांचा त्रास, अतिक्रमण, पार्किंगची समस्या अशी वेगवेगळे नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेत माजी नगरसेवकांचे दर्शन घडत आहे.