पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवर एकमत होत नसल्याने तब्बल साडेआठ महिन्यांपासून सात जणांची निवड लांबणीवर टाकली जात होती. अखेर, भाजपने सात स्वीकृत नगरसेवकांची नावे शुक्रवार (दि. २०) जाहीर केली.
त्यांच्यासह एकूण दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड पुढील महिन्यातील सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य फजल शेख आणि माजी नगरसेविका सीमा सावळे यांची नावे पूर्वीच देण्यात आली होती. ती नावे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वैध ठरवली आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपकडून दीडशेपेक्षा अधिक जण तीव्र इच्छुक असल्याने त्यांची निवड करण्याचा पेच निर्माण झाला होता.
अखेर, भाजपकडून ती सात नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहेत. महापौर रवी लांडगे यांनी सात नावांची घोषणा केली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक विकास डोळस आदी उपस्थित होते.
सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे या सात नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना १५ महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांना भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार आहे. पुढील काळात महिलांना संधी दिली जाईल, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी निश्चित झालेली नावे
सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे, ऋषिकेश म्हेत्रे (सर्व भाजप)राजेंद्र जगताप, फजल शेख, सीमा सावळे (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस)