पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियमित सर्वसाधारण सभेसह दोन तहकूब अशा एकूण तीन सभा शुक्रवारी (दि. २०) दुपारी दोनला होणार आहेत. त्यात स्वीकृत दहा नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. त्यात भाजप कोणत्या सात जणांना संधी देणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच, मोशी येथील गोल्फ कोर्स क्लबसाठी १५१.६७ एकर जागेचे आरक्षण टाकणे यासह अनेक महत्वाचे विषय आहेत.
महापालिकेची सर्वसाधारण नियमित सभा १५ ऑक्टोबरला आयोजित केली होती. मात्र, पदवीधर व शिक्षण मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे सभा तहकूब करण्यात आली. ती सभा उद्या महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोनला होणार आहे. सभेच्या पटलावर तीन सभांचे अनेक विषय आहेत. त्यावर सभेत कामकाज होणार आहे.
मोशी येथील वेगवेगळे दहा आरक्षण बदलून त्या एकूण १५१.६७ एकर जागेत गोल्फ कोर्स क्लबच्या नव्या आरक्षणास मान्यता देण्याचा प्रस्ताव सभेसमोर आहे. तो प्रस्ताव आयुक्तांकडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्या प्रस्तावाला सत्ताधार्यांकडून हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. ती नावे सभागृहात जाहीर केली जातील. त्यात कोणाकोणाचा समावेश आहे, याची उत्सकुता लागली आहे.
तहकूब सभेसमोर विषय
पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंतचा रस्त्याचे काँक्रीटीकरणाच्या कामास सुधारित वाढीव ३९ कोटी ६८ लाख १७ हजार ८१० रुपये खर्चास मान्यता देणे.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांना लागू असलेली वैद्यकीय उपाचारासाठीची धन्वंतरी गोल्ड योजना नगरसेवकांना लागू करण्याच्या खर्चास मान्यता देणे.
अ क्षेत्रीय कार्यालयातील क्रीडा स्थापत्य कामासाठी ६ कोटींच्या निधीचे वर्गीकरण करणे.
कार्यरत महिलांसाठी वाकड येथे वसतीगृह बांधण्यासाठी निधीत वाढ करणे.
राज्य शासनाकडून हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानात महापालिकेस मिळालेल्या पाच कोटींचा निधी महापालिकेच्या शाळांतील प्रयोगशाळा व वाचनालयासाठी तसेच, रुग्णालय व दवाखान्यात वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरणे आदी विषय आहेत.
तसेच, पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजन समिती स्थापन करून चित्रपट महोत्सव आयोजनासाठी येणार्या खर्चास मान्यता देणे.
पिंपळे गुरव येथील पाण्याच्या टाकीतून वितरण व्यवस्थेचे परिचालनासाठी मजूर पुरवण्याच्या कामास १ कोटी २० लाखांचा निधी वर्ग करणे.
पवना धरणावर फ्लोटिंग सौर ऊर्जा पॅनेल बसविणे.
मोशी येथील १५१.६७ एकर जागेतील विविध दहा आरक्षण बदलून गोल्फ कोर्स क्लबच्या फेरबदलास मान्यता देणे.
चिंचवड येथील दळवीनगर ते एसकेएफ ते चापेकर चौकापर्यंतचा ३१ मीटर रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार कामाचा सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात समावेश करणे आदी विषय आहेत.
नोव्हेंबरच्या नियमित सभेसमोर विषय
पुनावळेतील जागेसाठी मोदबला देणे.
निगडी ते दापोडी अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचा निधी वळवणे.
ड क्षेत्रीय कार्यालयांच्या विविध ३६ कामांसाठी निधीची वाढ-घट करणे.
क्रीडा विभागप्रमुखांना २५ लाखांपर्यंत खर्चाचे अधिकार देणे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकेस पाच लाखाची मदत देणे.
मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांना आपत्ती सेवा विभागाचे सहआयुक्तपदी पदोन्नतीने नियुक्ती देणे.
महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांना क्रीडा विभागाची पूर्वपरवानगी घेणे.
मोशी येथील १५ हेक्टर जागेचे आरक्षण बदलणे.
मोशी येथील ७० एकर जागेचे आरक्षण बदलणे.
ड्रेनेजलाईन विभागाची कामे अर्बन चॅलेंज फंडातून करणे.