पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आतापर्यंत केवळ 559 कोटी 91 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. महापालिकेचे ऐऐ प्लस क्रेडिटर रेटींग पत मानांकन आहे, असा दावा महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी केला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
शहरातील एका लोकप्रतिनिधीने त्यांच्याकडे महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती मागविली होती. त्या लोकप्रतिनिधीस दिलेल्या माहितीवरून वरील माहिती समोर आली आहे. जैन यांनी पत्रात नमूद केले आहे की, कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाण पुल बांधण्यासाठी 159 कोटी 91 लाख रूपयांचे कर्ज घेण्यात आला होते. ते कर्ज 30 वर्षासाठी आहे. त्यापैकी 91 कोटी 90 लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे.
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी 4 वर्षे कालावधीसाठी म्युन्सिपल बॉण्डद्वारे 200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी 90 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. हरित सेतू आणि टेल्को रस्तावर अर्बन स्ट्रीट डिजाईनद्वारे सुशोभिकरण करण्यासाठी ग्रीन बॉण्डद्वारे 200 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्याचा कालावधी 5 वर्षे आहे. त्यापैकी 13 कोटी 50 लाख रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 364 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे. ते खर्च केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेऊनच काढण्यात आले आहेत.
कर्जाचे हप्ते नियमितपणे अदा केले जात असून, कर्ज व व्याज परतफेडीकरीता महापालिका आर्थिक दृष्ट्या पूणेपणे सक्षम आहे. क्रिसील व केअर या क्रेडीट रेटींग संस्थेने महापालिकेस ऐऐ प्लस स्टेबल क्रेडीट रेटींग पत मानांकन दिले आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे द्योतक आहे, असा दावा जैन यांनी केला आहे.