

पिंपरी: दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात शहरात आतषबाजी करण्यात आली. त्यात पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवशी सर्वाधिक अतषबाजी झाली. मात्र, त्याचा कचरा, रिकामे बॉक्स, फुलांचे तोरण असा जवळपास साडेआठ हजार टन कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गोळा करण्यात आला. शहरभर दिवाळी उत्साहात साजरी झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी त्वरित रस्ते, उपनगरे स्वच्छ केल्याने नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले. (Latest Pimpri chinchwad News)
दिवाळीच्या सणाच्या कालावधीत फटाके, फुलांची तोरणे, पॅकेजिंगचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. शनिवार (दि. 18) धनत्रयोदशीच्या दिवशी दीपावली सणास सुरूवात झाली. त्या दिवसापासूनच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आताषबाजी करण्यास सुरूवात झाली. ही आताषबाजी गुरूवारी (दि. 23) भाऊबीजेपर्यंत सुरूच होती. या दिवसात रस्त्यावर व गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. याशिवाय हार, फुले, खरकटे अन्नही मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्याने कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. या सहा दिवसांमध्ये शहरामध्ये 8 हजार 795 टन कचरा निर्मिती झाली.
कचऱ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठही क्षेत्रीय कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रात्री झालेला कचरा साफ करण्यासाठी भल्या पहाटेच कर्मचारी रस्त्यावर दिसत होते. यानंतर सर्व कचरा एका ठिकाणी जमा करण्यात आला. तसेच, तो उचलून अन्यत्र हलविण्यात आला. सकाळी 11 वाजेपर्यंत शहरातील गल्ल्या, रस्ते, चौक पूर्ण चकाचक होत असे. त्यासाठी महापालिकेचे तसेच कंत्राटी कर्मचारी दिवस-रात्र राबत होते.
दररोज पाचशे क्विंटल कचऱ्याची भर
साधारपणे दैनंदिन दिवसाला 1 हजार 100 टन कचरा निर्माण होतो. दिवाळीमध्ये यामध्ये तब्बल 400 ते 500 क्विंटल कचऱ्याची भर पडली. हा कचरा साफ करण्यासाठी सणाच्या सुट्ट्यांमध्येही कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला. कचरा डेपोवर अतिरिक्त फेऱ्या लावण्यात आल्या, तर काही ठिकाणी रात्रपाळीही घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या अचूक नियोजनामुळे शहरात दिवाळीच्या सणामध्ये होणारी कचराकोंडी टाळता आली.
सणासुदीच्या काळात निर्माण होणारा जादा कचरा वेळोवेळी साफ करण्यासाठी सूचना केल्या होत्या. आरोग्य विभाग आणि सफाई कर्मचारी अविरतपणे काम करीत राहिले. सणउत्सवाच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली.
सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका