पिंपरी: सायबर पोलिसांनी वारंवार जनजागृती करूनही पिंपरी-चिंचवड शहरात अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल ६० जणांवर म्युल अकाउंटप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडून या नागरिकांनी स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात दिली. परिणामी, सायबर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी खात्यांचा वापर होऊन संबंधित खातेधारकच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. सायबर गुन्हेगारीत अशा खातेधारकांना 'म्युल' अर्थात 'गाढव' म्हटले जाते. पोलिसांकडून सातत्याने इशारे दिले जात असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक या सापळ्यात अडकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्राम, व्हॉट्स ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया माध्यमांवरून गुन्हेगार नागरिकांशी संपर्क साधतात. ‘बँक खाते वापरायला द्या, पाच टक्के कमिशन मिळेल’, ‘क्रेडिट स्कोअर वाढवून देतो’, ‘वर्क फ्रॉम होम’, ‘गेमिंग किंवा शेअर ट्रेडिंगचे पैसे तुमच्या खात्यात येतील’ अशा आमिषांनी विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे आणि ऑनलाइन व्यवहारांची माहिती मिळवून त्यांचा गैरवापर केला जातो.
फसवणुकीतून मिळालेली रक्कम प्रथम म्युल अकाउंटमध्ये जमा केली जाते. काही मिनिटांतच ती वेगवेगळ्या बँक खाती, ई-वॉलेट किंवा इतर माध्यमांतून पुढे वर्ग केली जाते. त्यामुळे पैशांचा मूळ स्रोत लपविणे गुन्हेगारांना सोपे होऊन तपासाची दिशा सर्वप्रथम खातेधारकाकडे वळते. परिणामी, संबंधित नागरिकालाच गुन्हा, चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
यातील धक्कादायक बाब म्हणजे, अनेकांना आपण सायबर गुन्ह्याचा भाग बनलो आहोत, याची कल्पनाही नसते. काही जण आर्थिक मोहापायी, तर काही जण अज्ञानातून आपली बँक खाती इतरांच्या वापरासाठी देतात. अशा वेळी प्रत्यक्ष गुन्हेगार दूर राहतात; मात्र आर्थिक व्यवहारांचा माग काढताना तपास यंत्रणांना सर्वप्रथम खातेधारकच आढळतो. त्यामुळे अल्प फायद्याच्या अपेक्षेपोटी मोठ्या कायदेशीर अडचणी ओढवल्या जात असल्याचे चित्र आहे.
मागील काही महिन्यांत म्युल अकाउंटच्या माध्यमातून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांची पद्धत अधिक संघटित झाल्याचे तपासातून दिसून आले आहे. वेगवेगळ्या राज्यांतील खात्यांचा वापर करून काही मिनिटांत अनेक व्यवहार केले जात असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी स्वतःचे बँक खाते इतरांच्या वापरासाठी देणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
म्युल अकाउंटचे 'रेड फ्लॅग' ओळखा
कोणतेही काम न करता केवळ बँक खाते वापरू दिल्याबद्दल कमिशन देण्याची ऑफर, ‘तुमच्या खात्यात पैसे येतील, ते दुसऱ्या खात्यात पाठवा’, अशा सूचना, नवीन बँक खाते उघडण्याचा आग्रह, एटीएम कार्ड, चेकबुक, सीमकार्ड किंवा नेट बँकिंगची माहिती मागणे, अशा ऑफर्स येणे ही म्युल अकाउंटची प्रमुख लक्षणे मानली जातात. यातील कोणती ऑफर आल्यास त्याला बळी न पडता तात्काळ सायबर पोलिसांकडे माहिती द्यावी.
बँक खाते ‘फ्रीझ’ची शक्यता
म्युल अकाउंटचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित बँक खाते गोठवले (फ्रीज) जाऊ शकते. त्यानंतर खातेधारकाला बँकेची चौकशी, पोलिस तपास, न्यायालयीन प्रक्रिया तसेच आर्थिक व्यवहारांवरील निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. आपण निष्पाप असल्याचे सिद्ध करण्यासाठीही दीर्घ काळ खर्ची पडू शकतो.
सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती वापरून फसवणुकीची रक्कम फिरवत आहेत. थोड्याशा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे खाते इतरांना देणे हा गंभीर गुन्हा आहे. कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, ओटीपी किंवा ऑनलाइन बँकिंगची माहिती इतरांना देऊ नये. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ १९३० हेल्पलाइन किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार करावी.रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड