हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: वाहन चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी असली तरीही अनेकजण हेडफोन लावून वाहन चालविताना दिसतात. तर, दुचाकी चालविताना अनेकांच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. १ जानेवारी ते १५ जून २०२६ पर्यंत वाहतूक पोलिसांकडून ११ हजार १४८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ६८ लाख ८३ हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे.
शहरात दररोज सरासरी दोन ते तीन छोटे-मोठे अपघात होत आहेत. काही वेळेस मृत्यूदेखील होतात. बहुतांश अपघात वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्यामुळे होत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तरीही वाहन चालविताना स्टंट करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, रेसिंग यासारखे प्रकार घडून येताना दिसतात. त्यामुळे जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून ११ हजार १४८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ६८ लाख ८३ हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे.
काय सांगतो कायदा..
वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास मोटार वाहन आधिनियम २५० (अ) नुसार संबधित वाहनधारकास किमान एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मोटार वाहन आधिनियम १८४ नुसार वाहन वेगाने तसेच निष्काळजीपणे चालविणाऱ्यास दोन हजार रुपये दंड आकारला जातो. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये निष्काळजीपणे तसेच वाहतूक नियमांचा भंग करून वाहन चालविणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येते.
रील्सच्या नादात वाढताहेत अपघात
सध्याच्या तरुणाईला रिल्स तयार करण्याची आणि सोशल मीडियावर प्रसिध्द होण्याचे व्यसन लागले आहे. आपण तयार केलेल्या व्हिडीओला जास्तीत जास्त लाईक मिळाव्यात, म्हणून अनेकजण स्टंट करतात आणि स्टंट करताना वेगात वाहन पळवितात. तर, काही वेळेस समोर येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा पध्दतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
वाहने चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असली तरी हजारो वाहनचालक नियमाचे उल्लंघन करतात. मात्र, यामुळे आपले लक्ष विचलित होते आणि आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्या चालकांवर योग्य ती कारवाई केली जात आहे.विक्रांत देशमुख, पोलिस उपआयुक्त वाहतूक