Water Supply Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad MIDC Water Cut: पिंपरी-चिंचवडमध्ये एमआयडीसीची १० टक्के पाणी कपात; ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत लागू राहणार

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईची शक्यता; रावेत, निगडी, भोसरीसह औद्योगिक पट्ट्यात पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अपुर्‍या पावसामुळे व आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्ट्यात दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन एमआयडीसीने बुधवारी (दि.21) केले आहे.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा तसेच, पुढील वर्षी राज्यात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून पुढील वर्षी 31 ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व महापालिका आणि इतर संबंधित संस्थांना पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाण्याचे नियोजन व काटकसरीच्या वापरासाठी एमआयडीसीने कार्यवाही सुरू केली आहे.

एमआयडीसीकडून पवना नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून, पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांना तसेच, निवासी भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्या भागात दहा टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. ती पाणी कपात 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे.

परिणामी, नियमित वेळेपेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. उद्योजक आणि नागरिकांनी पाण्याचा काटसरीने व नियोजनपूर्वक वापर करावा. उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करावा. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर आवश्यक ठिकाणी करावा. पिण्याचा पाण्याचा वापर कमी करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे. दरम्यान, पवना धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन, भविष्यात आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवण्याचे नियोजन एमआयडीसीने केले आहे.

एमआयडीसी पाणीपुरवठा स्थिती

  • औद्योगिक भागात दररोज केला जाणारा पुरवठा : 100 एमएलडी

  • महापालिकेस दररोज दिले जाणारे पाणी : 30 एमएलडी

  • या औद्योगिक भागात पाणीपुरवठा : रावेत, निगडी, भोसरी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड औद्योगिक क्षेत्र.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT