पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी पहिली विशेष सभा 6 फेबुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी 2 फेबुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.
विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने येत्या 6 फेबुवारीला महापालिकेची पहिला विशेष सभा होणार आहे. ती सकाळी अकराला महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत.
त्यासाठी 2 फेबुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील नगरसचिव कार्यालयात स्वीकारण्यात येतील. दरम्यान, निवडणुकीत भाजपाचे 85 नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत. भाजपाकडून महापौरपदासाठी कोणाला संधी दिली जाते, याची शहरवासीयांत उत्सुकता निर्माण झाली आहे.