वर्षा काबळे
पिंपरी : पूर्वीची औद्योगिकनगरी म्हणजे पिंपरी-चिंचवड शहर आता सांस्कृतिकनगरी म्हणूनदेखील नावारूपाला येत आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीचा पाया असलेली मराठी नाट्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी पिंपरी -चिंचवड शहरातही मराठी नाट्य चळवळ पुढे जात आहे. शहरातील स्थानिक कलाकार हे देखील पुण्यातील कलाकारांच्या तोडीसतोड नाटके सादर करताना दिसतात. सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी कलाकारांनी चळवळीही उभ्या केल्या आहेत. 5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त शहरातील रंगभूमीच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.(Latest Pimpri chinchwad News)
शहरात मधु जोशी, धोंडीराम सायकर डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून पिंपरी-चिंचवड शहरात कलाकार मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, भूषण प्रधान, सौरभ गोखले, पुष्कराज चिरपुटकर आदी कलांवतांनी शहरातून सुरुवात करुन आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकीक मिळविले आहे.
शहरात 1999 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची स्थापना झाली. तेव्हापासून सांस्कृतिक चळवळ जोर धरू लागली आहे. त्याची प्रेरणा घेवून अनेक नाट्य संस्था उदयास आल्या आहेत. शहरात 25 ते 30 नाट्यसंस्था आहेत. ज्या नाट्य चळवळीचा वारसा चालवित आहेत. ज्यांचे वर्षभर उपक्रम असतात. पिंपरी-चिंचवड आयडॉल सारख्या स्पर्धा यातून उदयोन्मुख गायकांना संधी मिळते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलाकारांना याचा फायदा झाला आहे. त्यांना नामवंत ठिकाणी मोठ्या संधी आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य कलाकार हे अव्वल दर्जाचे आहेत. सर्वजण आपला नोकरी व्यवसाय सांभाळून सायंकाळी नाटकाचा सराव करतात. नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी स्वत:चा पैसा खर्च करून नाट्य कलेचे जतन केले जात आहे.
शहरात कलेला पूरक वातावरण असल्याने नाट्यक्षेत्रात अभिनव प्रयोग होत असतात. यात शहरातील प्रायोगिक रंगममचावर होणार्या प्रयोगांचा वाटा मोठा आहे. शहरात प्रायोगिक चळवळीतून नवे कलाकार रंगभूमीला मिळतात. शहरात ठिकठिकाणी प्रायोगिक रंगमंच चालवणार्या संस्थांमुळे या चळवळीला बळकटी मिळत आहे.
हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ही पूर्वी पुण्यात व्हायची पण अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पाठपुराव्याने आता शहरात दहा वर्षापासून चिंचवड येथे स्पर्धेचे केंद्र सुरू आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळते. जवळपास महिनाभर स्पर्धा सुरू असते. यामध्ये राज्यभरातून कलाकरार पिंपरी-चिंचवड शहरात आपली कला सादर करण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे चित्र आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दर आठवड्याला वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कलाकारांनी येवून वाचन कट्ट्यावर कला सादर करायची. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना शहरातून कला सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनाचे (दि. 5) निमित्त शहरातील कलावंतांसाठी एक महत्त्वाकांक्षी व नवीन उपक्रम कलाकार कट्टा सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ व मान्यवरांचा सत्कार समारंभ बुधवारी (दि.5) दुपारी चारला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलामंदिर येथे आयोजित केला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सांस्कृतिक वृद्धी व्हावी. कलाक्षेत्रांतील सर्व कलाकारांना एकाच छताखाली एकत्र आणून, त्यांच्या कलाकृतींना वाव देण्यासाठी आणि त्यांना एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा कलाकार कट्टा सुरू करण्यात येत आहे. कार्यक्रमात मराठी रंगभूमी दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास कलाकार, साहित्यिक, नाट्य, संगीत, लोककलावंत तसेच, नृत्य कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने नाट्यचळवळीचा पाया घातला. शहरात मोठ्या प्रमाणात हौशी कलाकार तयार होत आहेत. पूर्वी नाटक सादर करायचे म्हणजे प्रकाश आणि नेपथ्य हे सर्व शहरात मिळत नव्हते. ते पुण्यात जावून आणावे लागत होते. त्यासाठी त्या वस्तूचे भाडे आणि वाहतूक यांचा खर्च यायचा. नाट्य संस्थांना ते परवडत नव्हते. पण आता शहरातच या गोष्टींची पूर्तता होत आहे. आता फक्त एक अद्ययावत नाटकांच्या सेटच्या वर्कशॉपची मोठी गरज आहे.सुहास जोशी (ज्येष्ठ रंगकर्मी)
नाटक आणि मनोरंजन हा समाजप्रबोधनाचा भाग आहे. नाटकांविषयी लोकांचाही दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी नाटक म्हणजे विशिष्ट प्रकारचे लोक पाहतात असे होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्व स्तरातील लोक नाटक पहायला येतात. पालक देखील पाल्याला नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे मुलांचा अभिनयाकडे कल वाढला आहे. तसेच नाटक म्हणजे फक्त अभिनय असे नाही तर त्यासाठी लागणार्या तांत्रिक बाबी आहेत त्यामध्ये देखील करिअरच्या संधी लाभल्या आहेत.गौरी लोंढे (सहकार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिं.चि. शाखा आणि अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद पिं. चिं.)