पिंपरी: पिंपरी-चिंचवडची हवा बदलली आहे. नागरिकांना पर्याय मिळाला आहे. दोन भावंडे जोडली गेली आहेत. अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा व अनेकांची साथ मिळाली आहे. 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतर भोसरीच्या याच मैदानावर विजयी सभा होईल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार (दि. 13) भोसरी येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांची पिंपळे गुरव, भोसरी व दापोडी अशा तीन ठिकाणी येथे मंगळवार दुपारी सभा झाल्या. ते म्हणाले की, आमच्या सभेला परवानगी दिली नाही. स्थानिक पदाधिकार्यांनी पोलिसांनी दम दिला. पहाटे पाचला परवानगी दिली. ही कसली पद्धत. मी घेतो, तशी त्यांनीही सभा घ्यावी. आरोपांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान त्यांनी दिले. शहरातील गुंडगिरीबद्दल पवार म्हणाले की, कुदळवाडीतील हजारो लघुउद्योजकांना त्यांनी उद्ध्वस्त केले. बंगले पाडले. ते संसार तोडणारे तर, मी, संसार उभा करणारा दादा आहे. महापालिकेचे कर्मचारी, कामगार, शिक्षक, व्यापारी, पथविक्रेते खासगीत सांगतात की, भोसरीत युपी व बिहारसारखी स्थिती निर्माण झाली आहे. घर बांधायला घेतले की, आका येतो. खंडणी मागतो. सिमेंट, स्टील, वाळू, वीट आमच्याकडूनच अव्वाचा सव्वा भावाने घेण्याची सक्ती करतो, असे निवृत्त शिक्षकाच्या पत्नीने अश्रू पुसत सांगितले. ती दादागिरी भोसरीकर का खपवून घेत आहेत. ती माजोरी सत्ता उदध्वस्त करा. नासका आंबा हटवा. शहराचे वाटोळे करणार्यांना खड्यासारखे बाहेर फेका, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत ते म्हणाले की, अण्णासाहेब मगर स्टेडियम त्यांनी उद्ध्वस्त करून ठेवले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ई-लर्निंग, केबल फायबर नेटवर्किंग, वृक्षगणना, अर्बन स्ट्रीट डिजाईन, रस्ते साफसफाई अशा अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या 9 वर्षांत त्यांनी तब्बल 40 हजार कोटी रुपये कोठे खर्च केले, ते सांगावे. सत्तर लाख खर्चाचा शीतलबाग पादचारी पुलाचे काम 7 कोटींवर नेले. श्रीमंत महापालिका कर्जबाजारी केली. चोरी नाही, तर महापालिकेवर थेट दरोडा घातला. त्यात त्यांचे संपूर्ण घरदार गुंतले आहे. राजगुरूनगरमध्ये नातेवाईकांच्या नावाने जमिनी विकत घेतल्या आहेत. अचानक इतकी प्रॉपर्टी कशी वाढली. चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. सत्तेतील मलिदा खाण्यासाठी आपली लोक तिकडे गेली, असा आरोप त्यांनी केला. खेड, जुन्नर, आंबेगाव या भागांनंतर आता, पिंपरी-चिंचवडमध्ये बिबटे शिरले आहेत. असे असताना रात्रीच्या वेळेत महिला कर्मचार्यांकडून रस्ते साफ करून घेतले जात आहे. तुम्हाला आया-बहिणी नाहीत का, असा सवाल करीत शहरात बिबट्यानंतर लांडग्यांचाही त्रास वाढल्याची टीका त्यांनी केली.
लुटारूंची चौकशी लावणार
पिंपळे गुरव येथील आरक्षण क्रमांक 346, सर्व्हे क्रमांक 51 येथील रुग्णालयासाठी आरक्षित जागेत पत्राशेड टाकून ती लोक स्वत:चे खिसे भरत आहेत. महापालिकेच्या बॅडमिंटन हॉलला अधिक दराने शुल्क आकारून खेळाडूंची लूट सुरू आहे. यासह विविध प्रकरणांची चौकशी लावून त्यांना पळता भूई थोडी करू, असा इशारा देत नातेगोते, जातीपातीचा विचार करू नका. संपूर्ण पॅनलला मत द्या. भूलथापांना बळी पडू नका. सत्तेसाठी पैसा देतील मात्र, ते पाच वर्षे तुमच्या बोकांडी बसतील. महापालिका लूट लूट लुटतील. नागपंचमीला नागाची केवळ एक दिवस पूजा होते. उर्वरित सर्व दिवस नाग दिसला की मारा, असे चित्र असते. त्याप्रमाणे ते तुम्हाला वागणूक देतील, अशी टीका अजित पवार यांनी पिंपळे गुरव येथील कोपरा सभेत केली.
पहिल्या सभेतच आमचा महापौर घेणार पीएमपी, मेट्रो फ्रीचा निर्णय
माणसाच्या जन्मापासून पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील नागरिकांना पीएमपीएल व मेट्रोची सेवा मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी वयाच्या 75 वर्षांपर्यंत वाट पहावी लागणार नाही. त्यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता नाही. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका तो निर्णय घेऊ शकते. आमचा महापौर महापालिकेच्या पहिल्या सभेत त्यासंदर्भातील निर्णय घेणार आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.
मलाही घुटना डाव माहीत आहे
माझे नाणे खणखणीत आहे. मी कोणाच्या बापाचा मिंदा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्या कामात मी नाक खुपसत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास भारंदाज डावासारखे फिरवून फिरवून फेकून देईन. नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही. त्यांनाच कुस्तीतील डाव माहिती आहेत का, मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा गेली 12 वर्षांपासून अध्यक्ष आहे. घुटना चीत कसे करायचे, हे मला माहीत आहे, असा दम अजित पवार यांनी भरला.
आरोपांना उत्तर न देता जातीय रंग देण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड शहर व इतर परिसर मिळून शिवनेरी हा नवा जिल्ह्याचा प्रस्ताव आहे. कुलाबाचे नाव बदलून रायगड केले. उस्मानाबादचे धाराशीव केले. अशा प्रस्तावांना लोकप्रतिनिधी पाठबळ देतात. त्याला माझा विरोध नाही. मात्र, मी केलेल्या एकाही आरोपांना त्यांनी उत्तर दिलेले नाही. अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण केला जात आहे. एका विशिष्ट समुहाला खूश करण्यासाठी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चुका झाकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.