पिंपरी : अंडाभुर्जीच्या गाडीवरील किरकोळ वादातून खून करण्याचा कट रचणाऱ्या अल्पवयीन टोळक्याचा भंडाफोड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने केला. या कारवाईत दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा धागा लागला आहे. थेरगाव येथील साहिल विश्वनाथ बारणे (वय २४, रा. जय मल्हार नगर, थेरगाव) हा या टोळक्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले असून, त्याच्याकडेही एक पिस्तूल मिळून आले आहे.
साहिल बारणे, याचा भावकीतील एकाशी जमिनीचा वाद सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, या वादातूनच त्याने पिस्तूल आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या तपासाला आता नवे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी साहिलसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रवी ससाणे आणि सांगवीत अटक करण्यात आलेले आरोपी यांच्यात औंध येथील मॉलजवळ अंडाभुर्जीची गाडी लावण्यावरून वाद झाला होता. या वादातूनच आर्यन फंड (१९, रा. रांजणगाव) आणि गुरु सिंग (२३, रा. मध्य प्रदेश) यांच्यासह सहा अल्पवयीन मुलांनी ससाणे याचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मागवली होती. सांगवीतील एका रुग्णालयाच्या मागे ते भेटण्यासाठी जमले असताना, पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
अल्पवयीन टोळक्याचे थेरगाव कनेक्शन
या टोळक्यातील काही आरोपींचा संपर्क थेरगाव येथील साहिल बारणे याच्याशी असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पोलिसांनी साहिलला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल मिळाले. प्राथमिक चौकशीत साहिलने सांगवी प्रकरणातील आरोपींकडूनच पिस्तूल घेतल्याची कबुली दिली आहे. जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्यामुळे त्याने हे शस्त्र आणले असावे, अशी शंका पोलिसांना आहे. साहिलच्या ताब्यातून मिळालेले पिस्तूल मध्य प्रदेशातूनच मागवण्यात आले आहे. त्याचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोलिस पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
“थेरगावातील साहिल बारणे हा सांगवी खुनाचा कट प्रकरणात ताब्यात घेतलेल्या काही आरोपींच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडे पिस्तूल असल्याचेही समोर आले असून, जमिनीच्या वादातून त्याने ते विकत घेतले का, हे तपासले जात आहे.”— राजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे